राधा

सावळ्याचं निळं गोंदण 
राधा वागवत राहिली आपल्या तन – मनावर
एक असीम ओढीनं तिनं जपले 
प्रेम आणि विरहाच्या झुल्यावरचे अबोल क्षण
सावळा कर्म आणि धर्माची वेस हाती गच्च पकडून चालत राहिला एका
आदिम-अविनाशी भविष्याकडे…
राधेनं मात्र सांभाळला रितीभातींचा जनमान्य हुंकार
प्रवाहात राहूनही प्रवाहाविरुद्ध झुंजण्याचं राधेचं स्विकारलेपण
आणि नजरेआडचं जपता जपता समोरचं नाकारणारा ‘तो’ 
द्वंद्व तर मनातच घडलं असावं अन्यथा सगळा पट हातात असतानाही सावळ्याचं
अबद्ध नाकारलेपण राधेनं पचवलं कसं असावं? 
 
कृष्ण गोंदण 
राधेचे आंदण
द्वय देहाचे  
विरले मी पण
राधा – सावळ्याची निळाई
राधा – सावळ्याच्या बासुरीचा धुंद अलवार सूर
राधा – प्राक्तनाच्या कठोर जाणिवेलाही फुंकर घालणारी मंद झुळूक
विचारले असतील का मनातल्या मनात तरी राधेनं जाब दिल्या-घेतल्या वचनांचे?
मांडले असतील का हिशेब उन्मळून पडलेल्या आवेगांचे?
की जाणाऱ्यांची वाट अडवताना त्याच्या नजरेतली असहायता तिलाच नकोशी वाटली असावी?
तरीही अनुत्तरित प्रश्नाच्या झुल्यावर हिंदोळणारी राधा आणि ते प्रश्नच टाळत राहणारा सावळ्या… दोघेही सच्चे… दोघेही शाश्वत. 
कृष्ण राधा
राधा कृष्ण
एक तन  
एक मन
     
   
श्रद्धा   
०२. ०७. २०१६       
Advertisements
Posted in असेच काही…, सहज सुचलेलं, हिंदोळे मनाचे | यावर आपले मत नोंदवा

आताशा,

 
पाऊस अजूनही पडतो,
माती अजूनही हुळहुळते, धुमारे फुटतात,
सृजनाची ओढ अजूनही आपलं अस्तित्व 
राखून आहे… 
 
पण….
 
‘पावसाशी हितगुज मांडणारी ती ओळख
कुठेतरी हरवून बसलीये….’
 
आताशा,
 
रस्ते तेच आहेत, चालतं होण्याची सारी प्रलोभनं जशीच्या तशीच आहेत
आपापल्या जागी,
एखादी वळणवेडी पाऊलवाट ओळखीचं स्मित करतेही कधी,
 
पण….
 
‘पावलांना गती देणारी ती हाक
हरवलीये कुठेतरी….’       
 
आताशा,
 
अजूनही थरारते मन कातरवेळी सांजवात लागताना,
नकळत हात वेढले जातात समईची ज्योत झाकोळताना,
 
पण….
 
‘आत कुठेतरी ‘ज्योतीचं’ क्षणभांगुरत्व मान्य करण्याचं पोक्तपणही
येऊ लागलंय मनाला आताशा….’           
  
– श्रद्धा
Posted in असेच काही…, कविता, सहज सुचलेलं, हिंदोळे मनाचे | यावर आपले मत नोंदवा

सय…

बिलगून  येता तुझ्या आठवणींचे धुमारे
अवघ्या अस्तित्वाची सतार बनते
मी गुंफत जाते तुझ्या असण्याचे भास माझ्या भोवताली,
हलकीच जाग येते मग दाटल्या निजेला . . . .

स्वप्नांचे  ओघळ, स्पर्शांचे पिसारे
अकल्पिताचे काहूर उरी दाटलेले
मी शोधीत जाते स्मरणांचे किनारे
भासातल्या आभासांचे शहारे
मी मुक्त हुंगून घेते
तृप्त कोशातला स्पर्श बावरा
हलकीच गाज मग चांदण सयीला…

गुंफलेले  काळीज दुवे अन विरघळलेले क्षण
शरीरभर उमटत गेलेली गोडसर लय
तुझ्या चाहुलीने डहुळलेली मनाची फांदी
हलकीच बरसात मग उमलत्या कळ्यांची…

मी बिलगून घेते हि वाट ओळखीची
पुन्हा पुन्हा इथे हरवून शोधताना
भेटती नव्याने क्षण सारे दुरावताना
खेळ बिलोरी हा धुंद जाणिवांचा
हलकीच सय मग मिटल्या व्यथेला…

श्रद्धा – १२.४.२०१६

Posted in कविता, हिंदोळे मनाचे | Tagged , , | यावर आपले मत नोंदवा

​​​

खूप  दिवसांनी इकडे फिरकलेय … मनात उगाचच एक हुरहूर आहे… खूप दिवसांनी भेटलेल्या सखीला सामोरं जाताना येणारं एक अनामिक अस्वस्थपणा जाणवतोय … आदिम जवळीक आहेच तरीही अंतराने आलेला हळवा दुरावा ही आहेच …. अवघडलेलं तिऱ्हाईत पण सरलं की  ओळखीच्या खुणा लख्ख जाणवतील… आणि पुन्हा एकदा प्रवाह मोकळा होईल याची खात्री आहे.

तोपर्यंत ….
चलो दूर तक
अजनबी रस्तोंपे पैदल चले
कुछ न कहे
अपनी अपनी तनहाईयां लिये
सवालोंके दायरोंसे निकलकर
रीवाजोंकी सर्हदोके परे
हम युं ही साथ चलते रहें
कुछ न कहें….
दिप्ती नवल
Posted in हिंदोळे मनाचे | यावर आपले मत नोंदवा

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी

मराठी दिना निमित्त कवी कुसुमाग्रजांची माझी अत्यंत आवडती कविता पोस्ट करतेय……

टेकडीच्या माथ्यावर चिरेबंदी एक घर
पाही वाट अज्ञाताची, कोण जाणे कोठवर
बंगल्याच्या आवारात पिंपळाच्या वृक्षाखाली
एका खुर्चीमध्ये स्तब्ध कुण्या कविची सावली…

निस्तब्धाच्या काठावर उभे सारे चराचर
मौनरागी धूसरात रातकीटकांचे स्वर
तिमिराच्या घुमटात शांततेचा प्रतिध्वनी
एकांताच्या पिंपळाची सळसळ पानोपानी

क्षितीजाशी दूर कुठे वाट चुकलेले मेघ
दूर तेथ पर्वतात वणव्याची रक्‍तरेघ
मंद होती दूर तेथे शहराचे लक्ष दिवे
नीरवाच्या प्रवासात झेपावती शुभ्र थवे

खिरे रात्र कणकण धुळावल्या आसमंती
चुलीतल्या निखाऱ्याला राख चढतसे अंती
मातीच्याच कुशीमध्ये खाली कण्हणारे जग
आणि वर आभाळात तारकांची लगबग

नक्षत्रांच्या वरातीत तारकांची शुभ्र दळे
पालख्यांच्या पुढेमागे प्रकाशाचे गेंद कळे
अनंगाच्या उत्सवात तुटतात सारे बंध
आणि चांदण्यात ठरे वेडसर निशिगंध

हलकेच मेण्यातून कुणी डोकावते खाली
मेण्यामध्ये पडद्यात आतुरल्या हालचाली
नि:शब्दाच्या काठावर झोपलेला जलाशय
पाहुनिया पुनव ती उतरली घायघाय

शेवाळल्या डोहालाही येई जाग क्षणभर
चांदण्याच्या चाहुलीने थरथर पाण्यावर
काठावर बसलेल्या रातराणीलाही बाधा
रुक्‍मिणीच्या शृंगारात मोहरते वेडी राधा

तिला मिठी जीवनाची, त्याला चांदण्याचे हात
त्याच्या नेत्री निमंत्रण, तिचे बाहू अभिजात
अद्वैताच्या निरुपणी रंगलेले चराचर
आकाशाच्या श्रुतींसाठी, मातीचेच सप्तस्वर

कल्पिताच्या पंखावर वास्तवाचा वर्ख चढे
सृजनाच्या अंकुराशी रिते अमृताचे घडे
नक्षत्रांच्या गावामध्ये ज्याची नित्य ऊठबस
त्याने फक्‍त ओलांडली, पुढे अक्षरांची वेस…

टेकडीच्या माथ्यावर चिरेबंदी एक घर
पाही वाट अज्ञाताची, कोण जाणे कोठवर
बंगल्याच्या आवारात पिंपळाच्या झाडाखाली
एका खुर्चीमध्ये स्तब्ध, कुण्या कविची सावली…

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज

Posted in कविता, हिंदोळे मनाचे | यावर आपले मत नोंदवा

बुरखा​

 

काल सहजच मनात विचार आला
हट्टाने पांघरलेल्या समजूतदारपणाचा
बुरखा जरा चाचपायला हवा,
बऱ्याच दिवसांत हात फिरवला नाहीये 
त्याच्या वीणेवरून… 
 
घुसमटणाऱ्या आठवणींच्या हिसक्यांनी 
जरा कातर झालीये शिवण…
ठाऊक आहे मला, माझ्या डोळ्यांनाही
न जाणवलेले अनेक थेंब
अलगद टिपलेत यांनी…. 
ती ओलसर ऊब जरा उन्हात टाकायला हवी. 
 
कितीतरी काचणारे हळवे आघात
पोहोचूच दिले नाहीयेत माझ्यापर्यंत
मनाची तालमता आहे जरा टिकून
पण ‘बुरखा’ मात्र जीर्ण होतोय….
 
माझ्या ‘वस्त्रांकित’ जाणिवांचा देह
कधी थरारतो अधे – मधे
तेव्हा हा ‘बुरखाच’ तर असतो
घट्ट लपेटणारा मला.
 
सारेच आडोसे, हवेसे अन नकोसेही
स्वतःच्या तलम धाग्यांत गुंफून घेतो
‘हवेसेच देताना’ अन ‘नकोसेही जपताना’
तटस्थ शहाणपण राखतोही नकळत. 
 
 
श्रद्धा
१०. १२. २०१३
Posted in हिंदोळे मनाचे | Tagged , | यावर आपले मत नोंदवा

अव्यक्त काही….

 

 
“अव्यक्त काही उरी दाटते
शब्दांचेही होत धुके
मौन डोळ्यांत बुडू लागता
अर्थांनाही जाग येते
 
नकोच आता खुळे बहाणे
नकोच ते वळून पाहणे
नकोच घालुयात शपथा वेड्या
नको चाचपडूया परतीच्या वाटा
 
असुदे असेच शब्दांचे ओझे
नको मोजूया आपल्यातील अंतर
आभासापरी आठवणी आपल्या
जाऊदे अशाच विरघळून क्षणभर
 
मौनात भिजूदे मौनाचीच भाषा
दुःखाला हलकेच कुरवाळताना
डोळा अलगद उतरु दे पाणी
हळव्या कातरवेळा सरताना”
 
असुदे सोबत उशास आता
क्षण ओघळलेले स्मरणातुनि
काळीजगुंतल्या वळणवाटा
फ़िरुनि पुन्हा हरवण्यासाठी”

-by shradha

18.07.2013

Posted in कविता, हिंदोळे मनाचे | Tagged , | १ प्रतिक्रिया