मन धुंद पावसाळी…….

“रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन,

भिगे आज इस मौसम में, लागी कैसी ये अगन….”

एका रेषेत धारांचे तुषार बरसवत हा पाऊस सुरु झाला की बाहेरील सृष्टीबरोबरच मनातली स्पंदनंही झरझर बदलतात. बंद काचेच्या आतमध्ये कितीही गुंगून गेलो

तरी काचेच्या बाहेरचा हा धुंद ऋतू आतमध्ये दस्तक दिल्यावीन कसं राहील? निर्जीव कागदाच्या अन क्लिष्ट आकड्यांच्या तितक्याच क्लिष्ट वातावरणातही थेंबांच
संगीत तन- मनाला वेड लावतंच.
पाऊस…………….
येण्याआगोदर पासूनच स्वतःच्या आगमनाची ग्वाही देणारा. त्याचं अस्तित्व डोळ्याला दिसत नसूनही जाणवत मात्र रहाते. ग्रीष्माचा दाह क्षणात विसरायला
लावणारी मंद झुळूक, सगळीकडे गच्च दाटलेले, काळ्याभोर ढगांनी लगडलेलं आभाळ, ग्रीष्मातल्या काहिलीने त्रस्त झालेली झाडे, तृषार्त होऊन वाट पाहणारी पानं, आणि स्वतःचा कण न कण झंकारत त्याच्या येण्याची वाट पाहणारी धरती, तो यावा अन त्यांना द्यावं दान आभाळाचं, चिंब भिजवावं त्याच्या सचैल धारांत. तो येणारच असतो की,
फुलण्यासाठी व फुलवण्यासाठी. सृजनाचं गीत ओठी गुणगुणण्यासाठी.
त्याचं प्रत्येक रुपडं, त्याचा द्वाडपणा सारंच किती लोभसवाण. कधी मंद गाज घेऊन स्थितप्रज्ञासारखा बरसणारा पाऊस तर कधी द्वाड पण तितक्याच निरागस मुलासारखा दुडूदुडू धावणारा. कधी जीवाचा सखा बनून ओंजळीत मावणारा तर कधी आईच्या मायेसारखा जोजवणारा पाऊस.
याचं सख्य कधीपासूनच बरं? आठवतही नाही पण अद्वैत नव्हतंच मुळी. जणू हा माझ्यातच आहे, माझ्याच स्पन्दानांबरोबर तनमनात साठून राहिलेला.
‘ये रे ये रे पावसा, तुला देते पैसा’ पासून सुरु झालेला हा स्नेह मग उत्तरोत्तर वाढतच गेला. त्याच्या संगतीनं आंगणात चिंब भिजणं, रागावणाऱ्या आईकडे दुर्लक्ष करून त्याच्याशी
चालणाऱ्या गुजगोष्टी आणि पुन्हा आईच्याच हातून खसाखसा डोकं पुसताना आईच्या मायेसारखाच जाणवलेला पाऊस अगदी मनात दाटून बसलाय. कागदी होड्या, डबक्यातला
दंगा, पावसाळी सहली, या साऱ्यांतून भेटलेला पाऊस, आयुष्याच्या कॅनव्हास वर साहून राहिलाय. नवथर वयातली गुपितं, लाडिक भांडणं, रुसवे-फुगवे, वाटून घेणारा पाऊस पुस्तकातलं पिंपळपानच जणू. केव्हाही उघडा, ओल्या आठवणींचा सडा ओंजळभर पसरणार.
घरापासून दूर राहताना, अशाच एका आठवणीने दाटलेल्या संध्याकाळी तो आला होता. अगदी अचानक बरसला होता. “ए वेडाबाई, अशी काय बसलीयेस, खिडकी तरी उघड.
बघ मी आलोय, धारांचे सप्तरंगी इंद्रधनुष्य घेऊन. ये अनिवार हो माझ्यासारखी”. असे सांगत धो धो कोसळला होता. मनातली हुरहूर स्वतःत विरघळवून मला मात्र ओल्या दवांचा
नजराणा देऊन गेला.
कॉलेजच्या दिवसांतला हा तर आजन्म सभासद जणू. असली नसलेली सारी creativity याच्या संगतीनं बहरून यायची. कुणाची भांडणं, कुणाचा विरह, सारं सारं याच्या संगतीनं
निभावून जायचं. तो येणार म्हणून आपली उत्कंठा ओणवावी तर हा चकवा देऊन पसार आणि सुट्टीच्या दिवशी याला चकवून भटकायला जावे तर हा वाटेतच अडवणार आणि कशी गम्मत केली म्हणून गडगडाटी हसणार. मग आम्हीही नरमायचो नाहीच. उलट त्याच्याच संगतीनं डोंगरदऱ्यामध्ये भटकायचो. त्याचं येणंच असं असायचं की त्याची साद अचूक टिपली जायची. मन धारा बनून हुल्लड व्हायचं.

आता अल्लड वयाचा थरार संपला. वाटलं थोडं शहाणपण आलं. पण तो मात्र तसाच आहे अजूनही. अवखळ आणि लबाड. त्याच्याशी असलेलं नातही तसंच आहे. फक्त या नात्याचे संदर्भ बदललेत. पूर्वी बाहेर असताना पाऊस आला तरी चिडचिड व्हायची नाही. आता त्याची जागा गच्चीवर वाळत घातलेल्या कपड्यांच्या काळजीने घेतली आहे.

पूवी आईकडे पाऊस असताना हमखास होणारी भाज्यांची फर्माईश आजही आहे फक्त भज्यांचे घाणे आता ती स्वतः काढते. कागदी होड्या आजूनही खुणावतात पण हा आनंद आता तिचं पिल्लूही वाटून घेतं. सहजीवानातली आंबट-गोड गुपितं आजही त्याच्या साथीनं बहरतात. तो असतोच अजूनही एक मूक सवंगड्याप्रमाणे.
त्याच्या येण्याला, बरसण्याला किती तरी आठवणींचे संदर्भ, चिरपरिचित गंध बिलगलेले असतात. ‘तो येणार’ या जाणीव आसुसतात. आजही तो आल्यावर उगाचच चाळला
आठवणींचा अल्बम आणि जाणवलं, अरेच्या बऱ्याच आठवणी आहेत की आपल्याकडे याच्या. थोड्या ओल्या, थोड्या हळव्या. काही टपोऱ्या तर पुष्कळशा चिंब भिजवणाऱ्या.
तो येतो आणि चिरपरिचित शिडकाव्यात थोडे नवे अनुभव विरघळतात. 🙂

“मन चिंब पावसाळी झाडत रंग ओले
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले
पाऊस पाखरांच्या पंखात थेंब थेंबी
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुम्बी

घरट्यात पंख मिटले झाडत गर्द वारा
गात्रात कापणारा ओला फिका पिसारा
या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे
आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे”

(फोटो जालावरून साभार)

Advertisements
This entry was posted in हिंदोळे मनाचे and tagged . Bookmark the permalink.

3 Responses to मन धुंद पावसाळी…….

  1. Ajinkya म्हणतो आहे:

    Awesome..

  2. Vivek Kulkarni म्हणतो आहे:

    mastach ahe ha lekh tai.

  3. Kedar patankar म्हणतो आहे:

    तुमची पोस्ट आवडली. पावसावरचे लेखन खूपजण करतात पण लिहिणाराही तितकाच रसिक असला व चिंब पावसाचं दर्शन लेखणीतून घडवून भिजवून टाकणारा असला तर वाचायची मजा औरच.

लिखाण आवडल्यास जरूर कळवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s