असाही एक दिवस….. (रात्र? :))

असाही एक दिवस….. (रात्र? :))

परवा मी आणि नवरा काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो… पुण्यातल्या संध्याकाळच्या गर्दीत चारचाकी पेक्षा बाईक बरी म्हणून बाईकवर गेलेलो. परत येताना नाही म्हणायला बराच उशीर झालेला. काम संपवलं आणि आता गाडीला किक मारून स्टार्ट करून २ एक मिनिटं झाली असतील तोच गाडी गचके देऊन थांबती झाली. असंख्य शंका-कुशंका घेऊन खाली उतरून पाहतो तो काय….. अनेकवेळा रीस्टार्ट करूनही बाईसाहेब आपला रुसवा सोडायला तयार नव्हत्या. नवऱ्याला विचारलं की बाबारे, “नक्की काय झालाय हिला”? तर बिचारा चेहऱ्यावर अष्टसात्विक भाव घेऊन वदता झाला,

“पेट्रोल संपलंय” 😦

“काय?!!! आता काय करायचं? आता घरी कसे पोहोचणार आणि आता पेट्रोलपंप  कुठे शोधणार? शी… किती उशीर होईल पोहोचायला…. (माझी प्रश्नावली सुरु झाली की बिचाऱ्याचा “दे माय धरणी ठाव’ चा पेटंट लूक तयार होतो)

“……….. 😦 😦 :(“

अरे जरा वाकडी करून तरी बघ, काही होतंय का. 

अगं हो, इतका वेळ तेच तर करून बघतोय. (बिचारा, या बयेला तोंड द्यायचं की या आपत्कालीन परस्थितीतून बाहेर पडायचं या द्वंद्वात अडकला होता)  

“………” 

“अगदी ड्राय झालीये आणि आता ढकलत नेण्याशिवाय पर्याय नाही. – इति नवरा.”

“अरे पण आता इथे पेट्रोलपंप मिळणार का? आणि तो चालू असेल नं?”

बघुयात चल. असे म्हणून आमची दुकटी निघाली पेट्रोलपंपच्या शोधात.

साधारण अर्धा किलोमीटर चालल्यावर एका पेट्रोलपंपचा बावटा फडकताना दिसला. खजिना गवसल्याच्या आनंदात आत वळणार तोच भलं मोठा बोर्ड आम्हाला वाकुल्या दाखवायला लागला, ‘बंद’.

“आता?” भलंमोठं प्रश्नचिन्ह दोघांच्याही चेहऱ्यावर.

 “मला वाटतं, इथून साधारण १५-२० मिनिटांच्या अंतरावर एक पेट्रोलपंप आहे, तिथे नक्की मिळेल. चल लवकर.”

“काय????? अजून १५-२० मिनिटे ढकलायची गाडी. अरे किती वाजलेत. आणि घरी पिल्लाने उच्छाद मांडला असेल रे. “

अगं हो पण आता मी तरी काय करू? ऑप्शन नाहीये नं. तू घरी फोन कर आणि कळव.

अरे नाहीतर गाडी इथे लावून तू जातोस का रिक्षाने? आणि बॉटल मध्ये घेऊन ये नं. मी थांबते इथे.  

(पण बिचाऱ्याला बायको आणि गाडी दोन्ही सोडून जायची कल्पना फारशी मानवली नव्हती).

“अगं कशाला, चल गप्पा मारत पोहोचू आपण. तेवढ्याच गप्पाही होतील. नाही तरी एरवी म्हणतच असतेस, की तुला माझ्याशी बोलायला वेळच नसतो म्हणून. आता आहे संधी तर कशाला घालवा?” हो नं?

“आहा रे म्हणे, संधी कशाला सोडा.” 🙂 🙂  चल लवकर.

मनातल्या मनात हा तरी पेट्रोलपंप चालू असुदे असं साकडं घालत निघालो. पण इथेही दुर्दैवाचे दशावतार संपण्याची चिन्हे नव्हती. आम्ही पोहोचतच होतो तेवढ्यात मालक रुपी ‘पापाजी’ आडवे आले.

‘ओ जी, पेट्रोल तो खतम हो गया जी’. 🙂  

नवरा धापा टाकत, गाडी सावरत, पापाजीला मनवण्याचा प्रयत्न करू पाहतो. पण पापाजी एक वचनी, एक बाणीच्या कॅट्यागरितले निघाले. बधले नाहीतच उलट पुढच्या पेट्रोलपंपाचा अड्रेस देऊन आम्हाला वाटेला लावले.

आता मात्र माझ्या सहकार चळवळीने बंडाची जागा घ्यायला सुरुवात झाली होती. पारा हळूहळू आपली जागा सोडायला लागला होता.

 

“असा कसा रे तू? तुला आधी अंदाज घेता येत नाही का? रीझर्वलाच का नाही फिल केलंस?” आता काय करणारेस आणि???  धडधड तोफबाजी सुरु झाली होती. 

“अगं आता मला तरी काय माहित ही अशी मधेच बंद पडेल म्हणून? आणि किती दिवसांनी आपण तिला बाहेर काढलंय”  जाईल असं वाटलं होतं. येताना भरणारच होतो नं आपण.

तुझं आपलं हे नेहमीचंच आहे. आधी काही प्लानिंग नाही करायचं आणि असं अडकायचं मग.

अगं पण…. (चेहऱ्यावर ‘माते शरण दे आता’ चा लूक)

“पण आता काय पुढे???”

 हो जरा विचार करू दे थांब….

सम्याला फोन करतो. असेल तर येईल.  

“…………………………”    

 फोन उचलत नाहीये कार्ट, झोपलाय वाटतं. 😦

” हो रे, लोकं झोपतात जनरली या वेळेला. आपणच फिरतोय तेवढे पेट्रोल शोधत.” हाऊ स्वीट नं?

 (‘हिला बोलण्यात काही पॉइंट  नाही’ या अर्थाचा लूक देऊन दुसरा नंबर फिरवण्यात मग्न झाला)

“????”

“उंहू” 😦

चला मग आता स्वतःच प्रस्थान करूया मग.

तो ही झाला सज्ज. (पाऊले चालती पेट्रोलपंपची वाटच्या तालावर आम्ही निघालो)

गल्ली-बोळातला रस्ता सोडून मुख्य हाय वे ला लागलो. मजल – दरमजल करत चढाई चालू होती. मध्ये मध्ये चुरचुरीत शब्दांची देवाणघेवाणही चालू होती :). रस्त्यावरून झोकात पळणाऱ्या गाड्या बघून, ‘काय करू याचं’ याचे वारंवार उमाळे यायला लागलेले.  

तेवढ्यात एक रिक्षा आमच्या बाजूला येऊन थांबली. (बाकी पुण्यात रिक्षावाल्यांच्या नावाने कितीही बोटे मोडा पण गरज असो-नसो, ‘कुठे जायचं’ हे मात्र इमाने इतबारे विचारत असतात.)  असो.

काय, पेट्रोल संपलंय का? (किती मनकवडा नं?)

हं…… (नवरा) 

पेट्रोलपंप लई लांब हाय…

हं… (का जखमेवर मीठ चोळतोय?)

पोहोचंपत्तुर बंद व्हईल…….

“………” 

एक काम करा, बसा गाडीत, जाऊन घेऊन येऊ.  

त्याने अचानक पुढे केलेल्या मदतीच्या हाताने खरं तर हुरळून जायला होत होतं पण सहज सहजी कुणावर विश्वास न ठेवण्याच्या मराठी बाण्याने यावर वेळीच मात केली.

अं…….  नाही म्हणजे जाऊ आम्ही……. (नको तेव्हा पण कसले  शिष्टाचार सुचतात????) 

“अवो भाऊ, एवढ्या रातीचं कुठं अशी वरात काढतायसा? सोबत बाईमाणूस हाय, कशापाय उगीच तरास करताय त्यास्नी? चला बसा.

नाहीतर एक काम करा, ताईस्नि बसावा गाडीत, आण तुम्ही बसा गाडीव, म्या ढकलतो मागून, समदीच जाऊ.”

त्याच्या या आगळ्यावेगळ्या तोडग्यावर नाही म्हणायला मला दचकायलाच झालं. हा नक्की रिक्षा चालवणार की नवऱ्याची गाडी मागून ढकलणार? याचा काही केल्या उलगडा होत नव्हता. नवऱ्याकडे उत्तरादाखल पाहिलं तर चेहऱ्यावर मंद हसू घेऊन गाडीवर बसण्याच्या तयारीत होते साहेब.

चला, काय ते प्रत्यक्ष्यच बघू म्हणून मी ही रिक्षात बसले. बाकी दोघांनीही आपापल्या पोझिशन्स घेतल्या आणि…..

नवरा गाडीवर, रिक्षावाला स्टेरिंग पकडून एकीकडे स्वतःचं वाहन चालवत होता आणि एकीकडे नवऱ्याच्या गाडीलाही मागून धक्का मारत होता, कसं???? तर पायाने……

जोरात पायाने ढकलून जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जायचं की पुन्हा लाथ मारून त्याला पळतं करायचं. पुन्हा तोंडाने सूचनाही चालू….

‘आरं चल चल, ब्रेक नगं मारू’,  ‘चल चल आलोच, थांबू नगस..’,  ‘लेफ्ट घे लेफ्ट, सोडू नगं…’,  ‘हां चल चल आता उतार हाय, जाऊंदे झप्पदिशी’.  अर्रर, गेला गेला, दमानं घे दमानं, हे  अन बरंच काही………….

अक्षरशः ती १५-२० मिनिटं एक अवर्णनीय थरार अनुभवत होते मी. रिक्षावाल्याने आमच्या प्रॉब्लेमवर काढलेला विचित्र तोडगा बघून मी क्षणाक्षणाला हैराण होत होते.

या आशा १५-२० मिनिटांच्या शाब्दिक जुगलबंदीनंतर एकदाचं पेट्रोलपंप आलं. आणि सुदैवाने ते चालूही होतं व साठाही होता. पेट्रोलभरून झाल्यावर एक वेगळाच relaxing feel येत होता. बाहेर येऊन नवऱ्याने रिक्षावाल्याला काही पैसे देऊ केले. पण त्याने ठामपणे नाकारलं.

“अवो दादा, म्या काय पैश्यासाठी नव्हतो आलो. तुमची तकलीफ बघितली आण राहवलं न्हाय. मला बी लई येळला अशी तकलीफ व्हतीया. तुमची नड भागली, मला पावलं.

चला जावा आता. आदिच लई येळ झालाय. नीट जावा ताईस्नि घेऊन.” असं म्हणून निघून पण गेले.  

आयुष्यात घडणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टी, पण काही परीसस्पर्शाने त्यांचं मोल एवढं वाढतं की हे क्षण अमूल्य अनुभवांचे धडे बनून राहतात. हा प्रसंग त्याचंच प्रात्यक्षिक होतं जणू. त्यांच्या दूरवर जाणाऱ्या रिक्षाकडे बघत मला कुठेतरी अजूनही आयुष्यात निरपेक्ष आनंद शोधणारी माणुसकी बघून भरून येत होतं. एवढ्यावेळात साधं त्यांची विचारपूस करण्याचंही नं सुचण्याचा करंटेपणा केल्याबद्दल स्वतःला कोसत होते. नकळत त्यांच्या आभारासाठी हात जोडले गेले.  

अर्ध्या तासात आम्ही घरी पोहोचालोही. घराच्या उबदार वातावरणात शिरल्यावर खूपच आश्वासक वाटत होतं.

 “काय मग, आजची संध्याकाळ अविस्मरणीय होती की नाही?” नवरोबा विचारत होता.

“अगदी रे” 🙂 🙂 🙂

खालील कविता खास त्यांच्यासाठी….. 

 

 

खुबसुरत है वो लब
जो प्यारी बाते करते है
खुबसुरत है वो मुस्कुरहाट
जो दुसरोंकी चेहऱोपर मुस्कुरहाट सजा दे….
 
खुबसुरत है वो दिल
जो किसी के दर्द को समझे
जो किसी के दर्द मैं तडपे…..
  
खुबसुरत है वो जझबात
जो किसी का एहसास करे
खुबसुरत है वो एहसास
जो किसी के दर्द का दवा बने………
 
खुबसुरत  है वो आंसू
जो किसी के दर्द को मेहसूस कर के भिग जाये
खुबसुरत है वो है वो हाथ
जो किसी को मुश्कील वक्त  में थामलें…..
खुबसुरत  है वो कदम
जो किसी की मदद के लिये आगे बढते है !!!!!
खुबसुरत  है वो सोच
जो किसी के लिये अच्छा सोचते है
खुबसुरत  है वो इन्सान
जिस  को  खुदा  ने  ये
खूबसुरती अदा की !!

 

(कविता जालावरून साभार)

 

Advertisements
This entry was posted in हिंदोळे मनाचे and tagged . Bookmark the permalink.

6 Responses to असाही एक दिवस….. (रात्र? :))

 1. Tanvi म्हणतो आहे:

  ए रिक्षावाल्यांबाबत इतकं जनमत वाईट असताना मी एकटी विरोधी (म्हणजे रिक्षावाले सरसकट वाईट नसतात , उलट मला कायम चांगलेच रिक्षावाले भेटतात 🙂 ) बोर्ड घेऊन होते…. तू ही आलीस आता त्यात ….. 🙂

  पोस्ट आणि कविता दोन्हीही मस्त….

 2. आल्हाद alias Alhad म्हणतो आहे:

  पुणं आणि रिक्षावाल्यांबद्दलच्या मताचा बदल घडणेस ही ब्लॉगपोस्ट कारणीभूत ठरेल! 🙂

 3. ashvini म्हणतो आहे:

  Good job…… rikshawalyancha asa hi anubhav yene is very unique……

लिखाण आवडल्यास जरूर कळवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s