भरकटलेलं – काहीबाही

 

उन्मळून पडावं असं खूप काही आहे. झाकोळून जायला कारणही पुरेशी आहेत, पण न जाणे कुठला तरी चिवट तंतू सतत जाणीव करून देत असतो, नाही ‘तू’ मोडायचं नाहीस, वाकायचं नाहीस, रक्तातली धुगधुगी अजून विझली नाहीये अन आशेचे मनोरे एकेक इमले वर चढतच जातायत….. आशा….. अस्तनीतला निखारच जणू. अगम्यतेच्या वावटळीत भिरभिरताना कितीतरी वेळा या आशेच्या दोराला पकडूनच तर जगण्याचा प्रयत्न केला… आणि कधी त्याच वावटळीत स्वतःला असंख्य वेळा हेलपटवलं ही आहे….

समोर उभ्या असलेल्या दिलदार शत्रूशी लढता येईल पण मनातलं द्वंद्व कसं सोडवू?  बाईपणाचं लेबल लागलं तेव्हाच खरं तर याची ठोकबजावणीही झाली होती. फक्त आता पुन्हा पुन्हा रीमाइंडर वाजतायत… चालत राहा…… पड-झड-घड…..!!!! घडव!!!!! स्वतःला आणि ज्याला जीवन दिलायास त्याला… आता तुला परतीचे दोर नाहीतच…..

तरीही सारं काही आलबेल होईल ही वांझोटी आशा पिच्छा सोडत नाहीये. माझ्या हातात काय उरलंय? या अदृष्यामागे धावत राहणं? की नाकारू हे सगळं जे माझ्या आत्मसन्मानाशीच सौदा करू पहातंय? काय करायला हवंय मी? माहिती आहे हे सगळं मृगजळ आहे पण त्याच्या आभासीपणामागे ऊर फुटेस्तो धावत राहण्याचं प्राक्तन मी टाळू शकत नाहीये हीच काय ती अगतिकता.    

मन  दंग आहे अर्थ – अनर्थाच्या खोल डोहात. कुठलासा अदृश्य पडदा मन, बुद्धी वेढून राहतोय. खरंच काळात नाहीये या रात्रीचा गर्भ किती खोल आहे…. पहाट होईल की या गर्भातच अंत होईल माझ्यासकट माझ्या मनातल्या अभिमन्यूचा….. कोणास ठावूक?

अर्थ नि अनर्थ एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात

पाठीला पाठ लावून बसलेल्या….. धरतही नाहीत अन सोडतही नाहीत

किंवा मग नदीच्या दोन किनारयासारख्या…. 

मध्ये सबंध प्रलय घेऊन वावरणाऱ्या पण तरीही 

अस्तित्वाची ठळक किनार जपणाऱ्या…..

अनर्थाचं जोखड होतं खरंच पण 

‘अर्थही’ सुसह्य असतोच असं नाही….

अनर्थ त्यामानाने नशीबवान म्हणायचा

त्याला पैलू नाहीत निरनिराळ्या जाणिवांचे, पदर नाहीत शक्य-अशक्यतेचे

खणखणीत नाणं वास्तविक नाकारलेपणाचे…

पण ‘अर्थ’… 

माजघरात गाळलेला मूक अश्रूचा एक थेंब,

ढोल-ताश्यांच्या गजरात मिरवणारा आभास

किंवा मग..

नीती-अनितीच्या झुल्यावर झुलणारी महाकाय नागीण…

‘अर्थ’ काहीही….. तुम्ही घ्याल तसा……

 

श्रद्धा

 

 
Advertisements
This entry was posted in हिंदोळे मनाचे and tagged . Bookmark the permalink.

लिखाण आवडल्यास जरूर कळवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s