कातरवेळ…..

 
 
 

सांजवेळी क्षितीज लाल रंगात न्हात असताना किती शांत नि अबोल होत जातं. प्रकाशाचा राजा आपल्या कर्तव्यपूर्तीच्या अतीव समाधानात अस्ताला जात असतो. सांजसावल्यांचा फेर साऱ्या आसमंताला शाम रंगाने वेधून घेतात. निळाभोर आकाश सांजमेणा होऊन त्याला आपल्या कुशीत घेऊ बघतं. जणू दिवसभर नजरेआड राहिलेल्या बाळाला पदराआड घेऊन जोजवणारी, बाळाच्या दमलेल्या पण तरीही लोभसवाण्या चेहऱ्याकडे मायेने एकटक पाहत राहणारी आईच… पुन्हा एकदा तो आदिम रंग चराचरावर पसरत राहणार.

कमळाच्या देठासारख्या खोलवर पसरलेल्या या सांजसावल्या हळू-हळू मनाच्या गाभाऱ्यातउतरत जातात. मनाचा गाभाराही झंकारून उठतो. द्वैताची अद्वैताशी होणारी गळाभेट मग साऱ्या देह-मनावर चांदणझुल पसरवून जाते. हलके हलके देहमनाचा पसारा उजळून जातो. पणतीसारखा इवलासाच पण तरीही शाश्वत असा हा प्रकाश गात्रागात्रातून उतरत जातो…

मग मनामध्ये आठवणींचं राऊळ उभं राहता. पाहता पाहता या राऊळाचा कळस अगदी आभाळात पोहोचतो, बघता बघता दिसेनासा होतो.. माझ्या मला माझ्यापासूनच दूर करणारी ही निर्वात पोकळी या कळसाला गवसणी घालू लागते. अशावेळी हाती काय उरतं? मी मुकाट स्वतःला या वावटळीत लोटून देते. तटस्थपणे माझं भेलकांडण न्याहाळत रहाते. आयुष्याची क्षणभंगुरता मानस ढवळून टाकते..

 

कोSहम? कोSहम? कोSहम? चा बेबंद टाहो सारं काही बधीर करून जातो… मनात असंख्य मोहाचे जाळे विणणारा व त्यातच पुन्हा पुन्हा अडकत जाणारा जीव घुसमटतो, हेलपटतो… खोल खोल डोहात बुडत चालल्याची अगतिकता श्वास कोंडवते.. वेदनेचा आभाळ झुकत जातं… एकाकी जगण्याचं अवसान तुटून पडतं… व्यथेच्या रांगा अंगावर धावून येतात..

पण या अशा अंधारातही अंधाराशी लढणारा दिवा दृष्टीस पडतो… तेव्हा मनातही सुखाच्या आयुष्याचा…. जगण्याचा एक सांजदिवा लुकलुकायला लागतो. आयुष्यापासून दुरावलेल्या वाटा पुन्हा माझ्याशी संधान बांधतात. जगण्याचे मार्ग पुन्हा सोपे वाटू लागतात. कोरड्या झालेल्या चैतन्याच्या प्रवाहास पुन्हा एकदा ओल मिळू लागते अन अंधाराच्या साम्राज्याशी एकाकी लढणारी मी शांत गुलाबी चांदण्यात जगू पहाते…दुःखास बंदिस्त करून. एका सोनेरी पहाटेच्या प्रतीक्षेत…

 
 
Advertisements
This entry was posted in सहज सुचलेलं, हिंदोळे मनाचे and tagged . Bookmark the permalink.

5 Responses to कातरवेळ…..

 1. Prathm Pranu म्हणतो आहे:

  waa shradha khup sunder

 2. Anagha म्हणतो आहे:

  किती थोडे पण सशक्त लिहितेस श्रद्धा! आवडले 🙂

 3. Prachi म्हणतो आहे:

  वाह…. सांजवेळ माझ्यासाठी तर नेहमीच आठवणींची वेळ राहिली आहे. असं वाक्य आपल्यावर बिंबवलं गेल्यामुळे की कशाने माहिती नाही, पण एक हुरहूर अशी जाणवतेच संध्याकाळी. आणि त्यातून जर समुद्रकिनारी सूर्यास्त पाहत असू तर जास्तच…

  • shradha kulkarni म्हणतो आहे:

   धन्यवाद प्राची…. कधी एखादी सांजवेळ अशीही असते नं की मन अगदी कातर होऊन जातं बघ.. तसंच काहीसं शब्दात उतरवायचा प्रयत्न केलाय…
   तुझ्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. येत राहा ब्लॉगवर.

लिखाण आवडल्यास जरूर कळवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s