‘लांबणीवर टाकलेला आनंद’

खूप दिवसांपूर्वी पाडगावकरांची एक कविता वाचनात आली होती,

सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!
डोळे भरून तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुमच्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीच ठरवा!

साधेसेच शब्द पण व्यक्त होणारा अर्थ खूप भावला होता. असाच काहीसा अर्थ आज मला आलेल्या एका मेलचा होता. ‘लांबणीवर टाकलेला आनंद’. कळत  नकळत आपण छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद हरवत चाललो आहोत. जे समोर आहे त्याचा समरसून उपभोग घेण्याऐवजी आपण जे नाही त्यापायी आयुष्याचा

कितीतरी वेळ सुस्कारे  सोडण्यात घालवतो. आणि मग जगण्याचा फक्त भास उरतो पण प्रत्यक्ष मात्र आपण फक्त मृगजळामागे धावण्याचा सोपस्कार करतो.

खाली तो मेल दिलाय. मला खूप भावली. कदाचित तुमच्याही मनात असाच काहीसं असेल नं? चला तर मग निदान आपण सुरुवात तर नक्कीच करू शकतो

आनंदाच्या जागा शोधण्याचा, किंबहुना अशा जागा स्वतःच निर्माण करायचा प्रयत्न करत राहुयात. 🙂

 

 

बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला. दारात शिवराम.
शिवराम आमच्या सोसायटीतल्या लोकांच्या गाड्या-बाईक्स धुवायचं काम करतो. 
“साहेब, जरा काम होतं.” ‘पगार द्यायचा राहिलाय का माझ्याकडून?’

‘नाय साहेब, तो केवाच भेटला. पेढे द्यायचे होते. पोरगा धाव्वी झाला.’

‘अरे व्वा ! या आत या.’

आमच्या दाराचा उंबरठा शिवराम प्रथमच ओलांडत होता.
मी शिवरामला बसायला सांगितलं. तो आधी नको नको म्हणाला. आग्रह केला तेव्हा बसला. पण अवघडून.
मीही त्याच्या समोर बसताच त्याने माझ्या हातात पेढ्यांची पुडी ठेवली.

‘किती मार्क मिळाले मुलाला?’

‘बासट टक्के.’

‘अरे वा !’ त्याला बरं वाटावं म्हणून मी म्हटलं.

हल्ली ऐंशी-नव्वद टक्के ऐकायची इतकी सवय झाल्ये की तेवढे मार्क न मिळालेला माणूस नापास झाल्यासारखाच वाटतो. पण शिवराम खुष दिसत होता.

‘साहेब मी जाम खुश आहे. माझ्या अख्ख्या खानदानात इतका शिकलेला पहिला माणूस म्हणजे माझा पोरगा !’

‘अच्छा, म्हणून पेढे वगैरे!’

शिवरामला माझं बोलणं कदाचित आवडलं नसावं. तो हलकेच हसला आणि म्हणाला,
‘साहेब, परवडलं असतं ना, तर दरवर्षी वाटले असते पेढे. साहेब, माझा मुलगा फार हुशार नाही, ते माहित्ये मला. पन एकही वर्ष नापास न होता दर वर्षी त्याचे दोन दोन, तीन तीन टक्के वाढले – यात खुशी नाय का ? साहेब, माझा पोरगा आहे म्हणून नाही सांगत, पन तो जाम खराब कंडीशनमधे अभ्यास करायचा. तुमचं काय ते – शांत वातावरन ! – आमच्यासाठी ही चैन आहे साहेब! तो सादा पास झाला असता ना, तरी मी पेढे वाटले असते.’

मी गप्प बसल्याचं पाहून शिवराम म्हणाला, ‘साहेब सॉरी हा, काय चुकीचं बोललो असेन तर. माझ्या बापाची शिकवन. म्हनायचा, आनंद एकट्याने खाऊ नको – सगल्य्यांना वाट !
हे नुसते पेढे नाय साहेब – हा माझा आनंद आहे !’

मला भरून आलं. मी आतल्या खोलीत गेलो. एका नक्षीदार पाकिटात बक्षिसाची रक्कम भरली.

आतून मोठ्यांदा विचारलं, ‘शिवराम, मुलाचं नाव काय?’

विशाल.’ बाहेरून आवाज आला.

मी पाकिटावर लिहिलं – प्रिय विशाल, हार्दिक अभिनंदन ! नेहमी आनंदात रहा – तुझ्या बाबांसारखा !

शिवराम हे घ्या.’

साहेब हे कशाला ? तुम्ही माझ्याशी दोन मिन्ट बोल्लात यात आलं सगलं.’

हे विशालसाठी आहे! त्याला त्याच्या आवडीची पुस्तकं घेऊ देत यातुन.’

शिवराम काहीच न बोलता पाकिटाकडे बघत राहिला.

चहा वगैरे घेणार का ?’

‘नको साहेब, आणखी लाजवू नका. फक्त या पाकिटावर काय लिहिलंय ते जरा सांगाल? मला वाचता येत नाही. म्हनून…’

घरी जा आणि पाकीट विशालकडे द्या. तो वाचून दाखवेल तुम्हाला !’ मी हसत म्हटलं.

माझे आभार मानत शिवराम निघून गेला खरा पण त्याचा आनंदी चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता.
खुप दिवसांनी एका आनंदी आणि समाधानी माणसाला भेटलो होतो.

🙂 🙂 🙂

हल्ली अशी माणसं दुर्मिळ झाली आहेत. कोणाशी जरा बोलायला जा – तक्रारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा.
नव्वद -पंच्याण्णव टक्के मिळवून सुद्धा लांब चेहरे करून बसलेले मुलांचे पालक आठवले. आपल्या मुलाला/मुलीला हव्या त्या कॉलेजात प्रवेश मिळेपर्यंत त्यांनी आपला आनंद लांबणीवर टाकलाय, म्हणे.

आपण त्यांना नको हसुया. कारण आपण सगळेच असे झालोय – आनंद ‘लांबणीवर’ टाकणारे !

‘माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, स्पर्धेत टिकाव कसा लागेल, आज पाऊस पडतोय, माझा मूड नाही !’ – आनंद ‘लांबणीवर’ टाकायच्या या सगळ्या सबबी आहेत आहेत हे आधी मान्य करू या.

काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद मिळणार आहे – पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय ! Isn’t it strange ?

मोगऱ्याच्या फुलांचा गंध घ्यायला कितीसा वेळ लागतो ?

सूर्योदय-सूर्यास्त पाहायला किती पैसे पडतात ?

आंघोळ करताना गाणं म्हणताय, कोण मरायला येणारे तुमच्याशी स्पर्धा करायला ?

पाऊस पडतोय ? सोप्पं आहे – भिजायला जा !

अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला तुम्हाला ‘मूड’ लागतो ?

माणूस जन्म घेतो त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात.
परमेश्वराने एका हातात ‘आनंद’ आणि एका हातात ‘समाधान’ कोंबून पाठवलेलं असतं.
माणूस मोठा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबर ‘आनंद’ आणि ‘समाधान’ कुठे कुठे सांडत जातात.
आता ‘आनंदी’ होण्यासाठी ‘कोणावर’ तरी, ‘कशावर’ तरी अवलंबून राहावं लागतं.
कुणाच्या येण्यावर-कुणाच्या जाण्यावर. कुणाच्या असण्यावर-कुणाच्या नसण्यावर.
काहीतरी मिळाल्यावर-कोणीतरी गमावल्यावर. कुणाच्या बोलण्यावर- कुणाच्या न बोलण्यावर.

खरं तर, ‘आत’ आनंदाचा न आटणारा झरा वाहतोय. कधीही त्यात उडी मारावी आणि मस्त डुंबावं.
इतकं असून…आपण सगळे त्या झऱ्याच्या काठावर उभे आहोत – पाण्याच्या टँकरची वाट बघत !
जोवर हे वाट बघणं आहे तोवर ही तहान भागणं अशक्य !

इतरांशी तुलना करत आणखी पैसे, आणखी कपडे, आणखी मोठं घर, आणखी वरची ‘पोजिशन’, आणखी टक्के.. !
या ‘आणखी’च्या मागे धावता धावता त्या आनंदाच्या झऱ्यापासून किती लांब आलो आपण !
जावेद अख्तर साहेबांनी खूप छान लिहून ठेवलंय

‘सबका ख़ुशीसे फासला एक कदम है
हर घर में बस एक ही कमरा कम है !’

शिवराम भेटला नसता तर माझं आणि माझ्या आनंदामधलं ‘ते एका पावलाचं’ अंतर कदाचित भरून निघालं नसतं”. 🙂

 

 

Advertisements
This entry was posted in हिंदोळे मनाचे and tagged , . Bookmark the permalink.

6 Responses to ‘लांबणीवर टाकलेला आनंद’

 1. Mandar Joshi म्हणतो आहे:

  Shivram honyacha prayatn karayla hava.

 2. shradha kulkarni म्हणतो आहे:

  केदारजी,

  तुमचं निरीक्षण बरोबर आहे पण काये नं पहिल्यांदा झालेला टायपो तसाच continue झालाय. त्यामुळे… 🙂

 3. Kedar patankar म्हणतो आहे:

  तुमचे नाव जर श्रध्दा असेल तर नावात डी दोनवेळा पाहिजे. ये बात कुछ हजम नही हुई…:)) गंमत बरं का.

 4. Kedar patankar म्हणतो आहे:

  ही पोस्ट आवडली. लिहीत रहा, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
  मागच्या प्रतिक्रियेत एक गोष्ट सांगायची राहून गेली होती. ती अशी की, पोस्टलेखक व प्रतिसादक एकमेकांशी अशा पध्दतीने बोलू शकतात, याबद्दल आपण इंटरनेट तंत्रज्ञानाचे आभारी राहिले पाहिजे.

  • shradha kulkarni म्हणतो आहे:

   केदारजी,
   >>> पोस्टलेखक व प्रतिसादक एकमेकांशी अशा पध्दतीने बोलू शकतात, याबद्दल आपण इंटरनेट तंत्रज्ञानाचे आभारी राहिले पाहिजे.

   १००% अनुमोदन.

   तुमच्या शुभेच्छा आणि ईशकृपा माझ्याकडून उत्तमोत्तम लिखाण करवून घेत राहो हीच प्रार्थना.

लिखाण आवडल्यास जरूर कळवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s