नकुशा

ती…… जल्मच तिचा ‘नकुशीचा’…..

आई-बापाला पहिल्या चारही मुलीच. बापाच्या जीवाला  कुलदिपकाचे डोहाळे लागलेले. पाचव्यांदा चाहूल लागली तेव्हा मायेचा जीव सततच्या  पोरवड्यानं आधीच कातावलेला. त्यात बापानं धमकी दिलेली……घराला दिवा आला तर ठीक नाही तर दुसरं खटलं जमवतो म्हणून. ‘मायेनं’ ते दिवस सतत धाकधुकीतच घालवले. विचित्र अशा कात्रीत होती माय. पुन्हा पोरगीच आली पोटाला तर आपलं नांदणं काय खरं न्हाय म्हणून जीवाची आबाळ करावी अन येळं आधीच हे पोट रिकामं झालं तर बला टळल म्हणून देवाला साकडं घालावं का कोणच्या ना कोणच्या पुन्यैच्या भरवश्यावर आई अंबाबाईनं पोटी पोरगा घातला तर जल्मच कडंला जायचा म्हून नशिबाला कौल लावायचा….. समदं अधांतरीच लटकल्यालं. एक दिवस बी मायेच्या जीवाला चैन नव्हतं. दिस-रात अल्याड का पल्याड ह्याच झुल्यावर झुलायची माय. जिथं जलमाचं कारणच व्हय का नको च्या येशीवर टांगल्यालं व्हतं तिथं कसला जल्मसोहळा अन कसलं कवतिक. न्हायी म्हणायला माय कवा कवा रातीच्या अंधारात पोटावरून हात फिरवायची अन टिपं गाळायची.

 ‘म्हणायची माज्या नशिबाचं तारू तुज्या हातात हाय बग’… तू बी नगं अडकू आन मला बी नगं नाट लावूस….’   तवा माय काय बोल्ली कळलं न्हाय पर मायेचा हात जाणवत व्हता.

दिस भरलं…. मायेच्या जीव घेण्या कळा… सुईणीची लगबग… मधल्या अंगणात बापाच्या येरझऱ्या… पळ भरलं तसं देवानं वाट दावली…

मायेचा हुंकार अन तान्हं रडं पाठूपाठच धावलं. सुईणीनं बोंब मारली. “पोरगी आली वं माय. ‘पाचवीला पुजल्याली’        

मायेनं ऐकलं न हंबरडाच फोडला. “आरं माज्या कर्मा, हितं बी पाठ सोडली न्हाईस व्हय? आरं पोरगीच देण्यापेक्षा हिला जल्मताच मारली का न्हाईस? आता कसं करू रं माज्या कर्मा.  जलमाचं वाटुळं झालं रं माज्या…. त्या परीस न्हेलं  का न्हायी मला.”

“आवो पाटलीण बाई, आसं काय करून रहायलायसा. अवो नशिबाला कुणी हात लावतया का? पोरगी जलमली यात त्या तान्ह्या लेकराचा काय वं दोस? बगा तरी काय चंद्रावानी पोर हाय. घ्या, अंगावर घ्या तिला.”  – सुईण                         

“माज्या जलमाचं वाटूळं केलं हिनं. त्वांड बी बाग्णार न्हाय हिचं.” 

आरं माज्या देवा, जलमदेती मायच असं कराय लागली तर तिनं कुणाकड बगावं वो? असं नगा करू,… देव हाय जित्ता समदं निस्तरायला.

मायेनं तोंड फिरवलं. सुईण कापडात गुंडाळून पोरीला बापाकड द्याया निगाली. पर बाप व्हताच कुटं तितं. पोरगी झाल्याचं कळल्याबरुबर त्यो घराबाहेर पडला त्यो थेट देवळातच जाऊन बसला.

सुईण दाटल्या गळ्यानं म्हणाली, “बाये, जलमदात्या  आई-बापानंच तुज्याकड पाठ फिरवली. जगशील न्हायी तर मरशील, तुजं नशीब. आता देवच तुजा वाली.”  आसं म्हणून पोरीचं  मुटकूळं गायीच्या गोठ्यात ठेवून दिलं. शेजारी पाणी अन दुधाची वाटी बी ठेवून दिली. पहिल्या दोगी जरा जाणत्या व्हत्या त्यांना लक्ष ठीवायला सांगून ती निघून गेली. जाताना शेजारच्या बायजाला वाईच ध्यान ठिव म्हणून सांगितलं.

दिस डोक्यावर आला तसा बायजा गरम भाताची पातेली घेऊन आली.. मायेला घालायला. माजं ध्यान गोठ्यात बगून ती काय समजायचं ते समजली. पयलं पोरीला उचलून घरात आणली आन पदराखाली घेतली.

जलम देणारी न्हाय पर मायेच्या नात्यानं बायजा तिची ‘माय’ झाली.

मायेला म्हणाली, “माय असून मायपण इसरलीस, कुटं गं फेडशीला हे पाप?” म्या घेऊन जाते हिला. गरज वाटली तर घिऊन जा न्हायतर व्हाडल माज्या पोरानसंगट. आणि एक पोर जड न्हायी व्हायची मला.”  – बायजा निगाली. मागं राहीलं ते मायेचं हुंदकं आन तिच्या कपाळावर बसलेला नकुशीचा छाप.

१०-१२ दिस गेलं तसं सारा गाव मायेला आन बापाला बोल लावू लागलं. गावच्या बड्या बुढ्यानी दोन गोष्टी सांगितल्या तवा तिचा गिऱ्हपरवेश झाला पर कोणाच्या मनामंदी परवेश न्हाय गावला. आधीच्या इतक्या गोतावळ्यात तसी अडचण न्हाय पडली. जितं ऱ्हायला काही जादा न्हाय लागत ना. जगली ती बी.

आसच २-४ साल गेलं आन माय पुन्यांदा पोटुशी ऱ्हायली. सगळ्या घराला पुन्हा पोराचं ढवाळं लागलं. या वक्ताला माय आन बापाची पुन्याई कामाला आली आन एकदाचा वौंशाचा दिवा घराला भेटला. दोगालाबी जलमाचं सार्थक झाल्यागत वाटलं. आन तवापासून पोरीच्या बी दैवानं पलटी खाल्ली. इतकं दिस ‘नकुशी’ असणारी ती आता पाठीव भाऊ आणला म्हणून भाग्याची झाली. तिची पाठ भाग्याची म्हून तिच्या पाठिव हातवं बी दिलं. काय काय कवतिक, नवी कापडं, गोड-धोडाचं, आणि काय काय.

येणारी-जाणारी बी लयी कौतुकानी बगायची. मायीला तर तिला आता कुटं ठिवू अन कुठं न्हायी असं झालं. समदी उधाणली व्हती पर ह्या समद्यामधी बायजा मातुर सयीर – भयीर व्हती.

पाटलानं पोराच्या बारशाला जबरी घाट घातला. बायजाबी व्हतीच. समद्यांची लगबग बघून ती येळमेजली. तिला काय ग्वाड लागना. पर बरं न्हायी दिसाचं म्हून बसून रऱ्हायली.

‘तिला उमगणा, इतकं दिवस नकुशी असलेली पोर, एका पोराच्या जल्मानंतर एकदम भाग्याची कशी झाली. जल्मलेल्या लेकराला फकस्त पोरगी हाय म्हून तोंड फिरवणारी माय आज तिची आला – बला कशी घ्याया लागली. जो बाप पोरगी जीत्ती हाय का मेली याची बी फिकीर ठीवीत न्हवता त्यो एकदम पोरीला देवावाणी मानाय लागला? कसा? पोराची हाव मानसाला एवडी पिडती का त्यो माणूसपण बी इसरतो?’

तिनं पाटलीनीला इचारलच, का वं पाटलीनबाय, इतकं दिस नकुशी असलेली पोर पाठिव भाऊ घेऊन आली कि भाग्याची कशी व्हती वं?

तवाच, नवीन परकर पोलक्यातलं, नुकतंच वाट्याला आलेलं आपलं भाग्य लडिवाळपणे धरू पाहणारी पोर मायला इचारू लागली,          

“माय, नकुशी म्हणजी काय वं?”

पाटलीन हातातलं भांडं धरून जागच्या जागीच थिजून ऱ्हायली.

 

टीप: नुकतंच नवरात्र साजरं केला गेला. स्त्री-शक्तीचा जागर म्हणून रोज वेगवेगळ्या बातम्या वाचायला मिळाल्या. काही प्रत्यक्षही बघायला मिळालं. त्याचवेळेला, स्त्री-भ्रूण हत्या, कोवळ्या वयातल्या मुलींवरचे अत्याचार, या अक्षरशः टोकाच्या विरोधाभासाने मन हेलावून जात होतं. अशाच एका ठिणगीने मनातले विचार कागदावर उतरवायला बळ मिळालं.

हा लेख तसा विस्कळीत वाटण्याची दाट शक्यता आहे. पण विषयच असा होता कि जे सुचलं ते टायपत गेले. आशा आहे प्रयत्न समजून घ्याल. तुमच्या सूचना तसेच तुमचे मत नक्कीच गरजेचं आहे काही चांगलं निर्माण करण्यासाठी.

श्रद्धा कुलकर्णी

Advertisements
This entry was posted in सहज सुचलेलं, हिंदोळे मनाचे and tagged . Bookmark the permalink.

3 Responses to नकुशा

 1. shradha kulkarni म्हणतो आहे:

  अपर्णा,
  प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. विषयच असा नं कि दाखल घेतल्याशिवाय सोडवेना.

 2. Aparna म्हणतो आहे:

  खूप छान लिहिलंय…
  “माय, नकुशी म्हणजी काय वं?”
  😦

 3. Vivek Kulkarni म्हणतो आहे:

  Nice Poem……Great keep it up……

लिखाण आवडल्यास जरूर कळवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s