शिशीर ऋतूच्या पुनरागमे…..

 

रात्री प्रदीर्घ झाल्या की हिवाळ्याची चाहूल लागते. नुकत्याच होऊन गेलेल्या पावसात सुस्नात होऊन गेलेली सृष्टी धुक्याची झिरझिरीत चुनरी पेहरून सज्ज होते. सुरंगी गाताना लोभवणारे राघववेळेचे प्रहर जागे होऊ लागले व गंधगाररात्रीच्या लांब कृष्णसावल्या सरपटू लागल्या की शिशीर आगमनाची ग्वाही मिळते. हवेतला गारठा आणि हाडांपर्यंत पोहोचणारे थंड गार वारे आपलं अस्तित्व हलके हलके जाणवू लागतात. कापसागत भुरभुरणारं दंव इथे-तिथे सांडत साऱ्या वाटा धुक्यात बुडू लागल्या की शब्दांचंही धुकं होतं आणि मनातलं गाणं मुकं होतं. मग सुरु होतो आपलाच आपल्याशी संवाद. एरवीच्या दैनंदिन जीवनात ऋतूने बदललेली कूस कशी उमजावी?

दूर मंदिरात होणारा घंटारव, काकडारतीचा गजर, सावळ्या विठ्ठलाची शुचिर्भूत होउन भक्तांच्या मेळाव्यात स्थानापन्न होण्याची लगबग, आळसावलेल्या सूर्याचे लाडिक आळोखे-पिळोखे, नुकताच उमलू लागलेला रानगंध शिशीर आगमनाची वार्तादेऊ लागतात.

 नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली
दवांत भिजल्या रस्त्यावरती किरणांची रांगोळी…
 

‘मासानां मार्गशिर्षोSहम’, गीतेत उल्लेखलेला, रामायणात गौरवलेला इष्ट ऋतू. इष्ट पण कशासाठी, बहरून येण्यासाठी की सरते बहर जपण्यासाठी? केशरांचे दिवे अंगी पेटवण्यासाठी येणारी हि गुलाबी थंडी सांद्र ओढाळ आठवणींचे दुःख मागे झरत ठेवून जाते.

स्मरणाचे उत्सव तेवत ठेवण्यासाठीचा हा मंद-मधुर मास. त्या धुकेरी अंधारात स्मरणाचे मणीच हाती गवसत नाहीत. भरभरून सांगू पाहणारे सारे जुने गोड संदर्भ परक्या लिपीसारखे अनोळखे होतात. रोजच्या चक्रात गरगरताना गवसणीतील संवादिका मग अचानक गुलबकावली होऊन हाती येते अन आपसूकच हरखून जायला होतं.

पण हिवाळ्यातल्या रात्री फार सुंदर असतात. कृष्णसावल्यांनी व्याप्त प्रदीर्घ रात्री. पौर्णिमेचा नखरा उतरून टाकणाऱ्या व रात्रभर आभाळात चंदेरी कलाबतूचे कण सांडत चमचमत राहणाऱ्या लक्षावधी चिमुकल्या चांदण्या. मनाला भुरळ घालणारी बदामी चंद्रकोर आभाळाच्या निळाईत विलसत राहते. रानावनातून, शेताभातातून भरून राहिलेला गव्हाच्या ओंब्याचा मादक गंध. तळ्यातली लाल-निळी कमळं. सरत्या हेमंतात मात्र जादूची कांडी फिरवावी तशी तळ्यातली सारी कमळं गायब होऊन जातात आणि शिल्लक राहतात कमळाच्या देठासारख्या लांबलचक खोलवर पसरलेल्या शिशिरातील रात्री. चकवा लावणाऱ्या, भुलभुलय्यात घेऊन जाणाऱ्या. दंवांचे गजरे गुंफता यायचं हळवं वय सरलं तरी जाणत्या वाटा स्मरणात निरंतर टकटकतात. मनात झुलत राहते घरामागच्या टेकाडावरची चवऱ्या ढाळणारी शिरीषाची डेरेदार रांग. दारी झुलणारी शुभ्र कुंदांची भरगच्च कमान. पिवळ्याधम्म पायांच्या साळुंख्या आणि कलत्या संध्याकाळी एका रेषेत परतणारे गर्द राव्यांचे थवे. दिवस-रात्र टपटपणारी पिवळट तपकिरी पानं, अन उघडी बोडकी होत जाणारी निष्पर्ण झाडे पाहिली की कॉलेजात असताना निरर्थक वाटलेल्या ओळी मग पाठलाग करत येतात.

 “शिशीर ऋतूच्या पुनरागमे
एकेक पान गळावया
का लागता येतसे मज
नकळे उगाच रडावया”
 
 

पण उडून गेलेली इवली सुकुमार पाखरे घरट्यात परतणार नाहीत हे कुठंतरी उमजत जातंच. शिशिरातल्या हरेक कृष्णमेधावी कातरवेळी ह्या वाटा तुडवणं मग अपरिहार्यच बनतं. निळ्याभोर दिशांमधून पिसासारखी तरंगणारी घननीळ चव रात्रीच्या सुरईत भरून आयुष्याची झिंग गात्रांत साठवण्याची धडपडही व्यर्थ वाटू लागते. दाटून येणाऱ्या हिवाळ्यातील मायावी गर्द लांब लांब सावल्यांवर, ठसठसणाऱ्या खोल जखमांवर मेहंदी हसनचे सूर, गुलाबपाणी शिंपडत जातात.

 “थंडी सर्द हवां के झोके
आग लगाकर छोड गये
गुल खिले शाखोपर नये
और दर्द पुराने याद आये”
 

त्यासरशी थंडी सर्द हवा वाऱ्याच्या बेनाम झुळकेसारखी हळवी वाटायला लागते. दुखणाऱ्या जखमेला हळुवार फुंकर घालत रिझवते. त्या ठसठसणाऱ्या आर्त जखमेचं संगीत होऊन अवघा देह सुरमय होऊन जातो.

 
Advertisements
This entry was posted in हिंदोळे मनाचे and tagged . Bookmark the permalink.

लिखाण आवडल्यास जरूर कळवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s