प्रिय श्रावी,

आठवतं तुला? २ दिवसांपूर्वी मी खूप अस्वस्थ होते. माझा मूडच नव्हता अजिबात. सवयीने कामं उरकत होते खरं पण मन थाऱ्यावर नव्हतं हे जास्त खरं. रात्री झोपायला गेलो तेव्हाही हा अस्वस्थपणा माझी पाठ सोडत नव्हता. तुझी झोपेची तयारी करता करता कदाचित तुलाही हे जाणवलं असावं की मम्मा नेहेमीप्रमाणे हैप्पीवाल्या मूड मध्ये नाहीये. तू गप्पच होतीस. एरवीचा दंगा, अखंड बडबड, मला या नं त्या कारणानं हजारो प्रश्न विचारून भंडावून सोडणं यापैकी काहीच नव्हतं. मी स्वतःच एवढी गर्क होते माझ्या विचारांच्या आंदोलनांत. खरं सांगते पिल्ला, तुझ्याकडे लक्षच नव्हतं माझं. मी नेहेमीप्रमाणे ‘चल झोप आता’ असं म्हणल्यावर तूझा ‘मम्मा, आज कोणती गोष्ट? हा प्रश्नही आला नाही, मुकाट्यानं डोळे मिटून घेतलेस तू. हात नेहेमीप्रमाणेच तुझ्या डोक्यावरून फिरत होता. थोडावेळ तू अशीच शांत पडून राहिलीस. मला वाटलं झोपलीस तू म्हणून मी कूस बदलली.

आणि जणू मी मोकळी सापडायची वाट बघत असल्यागत विचार पुन्हा प्रकट झाले. इतका वेळ माझ्या ताब्यात असलेलं माझं मन मग विचारांच्या या कुंपणावरून त्या कुंपणावर धावू लागलं. घरातलं आजारपण, नोकरी, घरातलं सगळं नियोजन, तुझं रुटीन, भरीसभर घरातले माणसांचं सतत अनप्रेडिक्टेबल असणं, सततचा मानसिक ताण यांनी खरच थकून जायला झालं होतं. गेल्या काही दिवसांमधल्या खूपशा घडामोडी डोळ्यांसमोर तरळत होत्या. त्यातल्या बऱ्याचश्या हळव्या नी बऱ्याचश्या दुखावणाऱ्या क्षणांना मनाने केव्हाच कुरवाळायला सुरुवात केली होती. डोळे नकळत वाहत होते. प्रचंड हतबल आणि निराश वाटत होतं. अचानक तू वळून मला म्हणालीस, मम्मा? तू रडतेश? क्षणभर दचकलेच मी. क्षणात माझ्या चेहऱ्याने खोटा मुखवटा ओढण्याची लगबग केली. “नाही रे पिल्ला”, मी कुठे रडतेय? पण पिल्ला तू पकडलस मला. माझ्या बाजूला येउन तू म्हणालीस पण. “मम्मा तू रडतेश”. एवढी सरळ-सरळ कोंडीत पकडले गेले होते नं मी. बचाव कसला केला असता मी?

काही न बोलता मी तुला जवळ ओढलं नि हमसून हमसून रडायला यायला लागलं मला. तुला जाणवलंच होतं काहीतरी बिघडल्याची. तू ही स्तब्ध राहिलीस. मम्माच्या मनातलं भरून आलेलं आभाळ रितं होईतो.

मम्माआपण खेलुत कामी तुला बेटा – बेटा म्हणणार. तू मला सांगायचं, तुला कोणी मारलं ते हं ? चल.

मग नेहेमीप्रमाणे माझ्या गळ्यात हात घालून तू विचारलंस, बेटा काय झालं? कशाला ललती? तुला कोणी मारलं?

मी हि नेहेमीचं उत्तर दिलं, मला बाऊ ने मारलं. मग तू त्या बाऊला ओरडलीस, का रे बाऊ  माझ्या बाळाला मारतोस? जा तिकडे. आणि मला म्हणालीस, मम्मा, बाऊ गेला आता रडू नकोश हं?

पिल्लू, त्याक्षणी आणखीच जडावलं ग माझं मन. वाटलं, आईच आहे समोर. मी अस्वस्थ असताना तिचं न

सांगता ओळखणं. अन असंच हळूच त्याला वाट करून देणं आठवलं. त्याक्षणी पिल्ला तू माझी आईच झाली होतीस गं. भलेही पद्धत वेगळी पण उद्देश एकच.

गेल्या काही दिवसांपूर्वी आपले अण्णा आजारी पडले. सतत कोणीतरी माणूस जवळ लागायचं त्यांना. त्यामुळे आजी त्यात गुंतली. मी अन बाबा, नोकरी सांभाळत जमेल तसं करत होतो त्यांचं. ह्या अचानक घडलेल्या घटनेमुळे तुझं रुटीन मात्र बिघडलं. आजीला तुझ्या शाळेच्या वेळा सांभाळणं जमेनासं झालं. म्हणून मग पर्यायी व्यवस्था म्हणून तुला शाळेतून परस्पर नानीकडे जायला लागू लागलं. २-३ दिवस तू ही खुश होतीस या बदलामुळे. पण सलग एक आठवड्यानंतरही जेव्हा हे कंटिन्यू राहिलं तेव्हा मात्र तू नाराजी नोंदवलीस. रोजच कशाला जायचं नानीकडे? म्हणून. नानीचं घर काही नवीन नव्हतं. तुलाही आवडायचं तिथे. पण बदल नक्कीच होता. तेव्हाही फक्त तुला एकदाच समजावलं. तुला जाणवून द्यायचा प्रयत्न केला कि काय अडचण आहे ते. त्यानंतर मात्र तू कधीही याबद्दल विचारलं नाहीस. जो बदल स्वीकारताना आम्ही अजूनही अडखळत होतो, त्याचा तू केलेला समंजस स्वीकार पाहून खूप अभिमान वाटला रे पिल्ला तुझा.

समोरचं ते इवलसं पिल्लू ज्या सहजतेनं परस्थितीशी जुळवून घेत होतं ते ग्रेटच होतं. बरोबरच आहे, हे तुला जमलं कारण अजून तू खूप निरागस आहेस नं एकदम. रूढ जगातल्या फुटपट्ट्या तुला खरं वागण्यापासून रोखू नाही शकत. तुझं नितळ मन तुझं वागणं किती प्युअर करतात.

पिल्लू, आम्ही मोठी माणसं हे कुठेतरी विसरलोय का रे?

एका आईच्या नजरेतून मी विचार करत होते तुला अचानक तुझं जमलेलं रुटीन बदलायला लागणार. एक नवं रुटीन तू कितपत जमवून घेशील? तू कशी react करशील याचा. पण तू किती सहज हे स्वीकारलंस? खूपच अनपेक्षित असताना. की मीच अनभिज्ञ होते तुझ्या या पैलू पासून?

बाळा, एक आई म्हणून मी नक्कीच सुखावलेय. माझ्या पिल्लाच्या संवेदनशीलतेमुळे. माझं पिल्लू तयार होतंय बदल पचवायला. तेही मनाची हळुवार वीण कुठेही न विस्कटता. 🙂 बाळा, अशीच जप ही संवेदना. जपशील नं?

श्रद्धा

सोमवार, 14 जानेवारी 2013

 

Advertisements
This entry was posted in हिंदोळे मनाचे and tagged . Bookmark the permalink.

2 Responses to प्रिय श्रावी,

  1. purvatarang म्हणतो आहे:

    खूप भरून आलं वाचताना…

लिखाण आवडल्यास जरूर कळवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s