पाऊसगाणी

 
 
 
 
नभ भरून आले
ऋतू बेधुंद झाला
वाऱ्याची बेगुमान साद
आता ये ना जराशी
पाचोळ्यानी धरला फेर
झाडे झिम्मा गं खेळती
चाले ढगांचा लपंडाव
आता ये ना जराशी
 
तहानल्या धरतीवर
जलधारा गं बरसती
झिम्माड ओली सांज
आता ये ना जराशी
 
मन पाऊस पाऊस
डोळे पाऊस पाऊस
तुझ्या पैंजणाची सय
आता ये ना जराशी
 
घरभर घन झाले
आभाळाची रिती माया
पाऊस जगण्यास हा
आता ये ना जराशी
 
-श्रद्धा
२१/०६/२०१३
 
 
 
Advertisements
Posted in कविता | Tagged , | यावर आपले मत नोंदवा

प्रिय श्रावी,

हा तुझ्या सुट्टीचा शेवटचा आठवडा. पुढच्या आठवड्यात शाळा सुरु होईल. मग तुला तुझंही एक रुटीन सापडेल आणि तू त्यात रमूनही जाशील.

खूप दिवसांनी तुला पत्र लिहितेय. आज मी तुझ्याशी जे बोलणार आहे नं ते मी तुला समोर सांगून समजणारच नाहीये पण तरीही मला असं वाटतंय की या टप्प्यावर तुझ्याशी बोलावं, निदान मला तुझ्यापर्यंत जे काही पोहोचवावंसं वाटतंय ते शब्दांत तरी मांडावं.

आज मला नं कसं वाटतंय सांगू? जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल प्रचंड passionate असतो, तेव्हा आपसूकच आपण ती गोष्ट सगळ्यांपेक्षा उत्कृष्ट असावी याबाबत आग्रही बनतो. त्यामध्ये सगळ्या ‘the best’ गुणवत्ता add करण्यासाठी धडपड करतो. त्या विषयी काही उणं असण्याचा विचारही आपणास सहन होत नाही. एक आईही आपल्या मुलाबाबत तितकीच passionate असते. तिला आपलं मूल कायमच ‘the best’ घडवायचं असतं. म्हणून तर आईच्या वर्तुळात फक्त आणि फक्त मुलांचा परीघ असतो. आई आणि मूल यात द्वैत कधी नसतच. आई कायम आपल्या मुलाच्या माध्यमातून स्वतः चं मूल्यमापन करत असते. मुलाच्या वागण्यामधून स्वतः चं यशापयश जोखत असते. मुलाचं कौतुक ती स्वतःचा आनंद मानते तर मुलाच्या अपयशात तिला स्वतःची हार दिसते. कदाचित मी जे म्हणतेय ते फार अतिशयोक्ती वाटेल, कदाचित मुलाचं स्वतंत्र व्यक्तिमत्व मला मान्य नाही असंही वाटू शकेल पण कसं असतं ना, तार्किकतेच्या कसोट्यांवर कितीही वेळा घासलं तरी हे तत्वज्ञान काही आईच्या पचनी पडायचं नाही. आई आणि मुलाची नाळच अशी जोडली गेलेली असते की आईला स्वतंत्र विचार उरतच नाही.

यावर्षी तुझी शाळा सुरु होणार आणि खऱ्या अर्थाने (ऑफिशियली) या जगाच्या स्पर्धेत तुझी वाटचाल सुरु होणार. इतके दिवस स्वच्छंद असलेलं तुझं बालपण एका रुटीन मध्ये आणि असंख्य नियमावलींमध्ये अडकलं जाणार. पण त्याच बरोबर तुझं क्षितीज विस्तारणार, असंख्य नव्या गोष्टींची दारं तुझ्यासाठी खुली होत जाणार. याच टप्प्यावर तुझी personality घडत जाईल. बाळा, मोठं होत जाताना सगळ्यांनाच या टप्प्यातून जावं लागतं. नव्हे ते तसंच असावं हेच उत्तम. आज आई म्हणून विचार करताना मी स्वतःही खूप nervous आहे. एक प्रचंड हुरहूर, उत्सुकता, आनंद, अशा अनेक संवेदना जाणवतायेत. आपलं एवढंसं पिल्लू, सतत आपल्या कुशीमध्ये दडणारं, प्रत्येक गोष्टीसाठी आई – आई करून मागे मागे करणारं, निरागस डोळ्यांचं, चांदण्यासारखं हसू असलेलं माझं गोडूलं माझ्या पासून सुटं सुटं होत जाणार हा विचारच खूप अस्वस्थ करणारा असतो गं. आपलं मूल मग ते कुठल्याही निमित्ताने का होईना आपल्यापासून स्वतंत्र होणार हा विचार खूप हलवणार असतो. यामागे फक्त दुखावलेपण नसतं पण त्यामागे आपल्या पिल्लाची काळजी लागलेली असते. या अतीच वास्तव जगात आपल्या पिल्लाचा कसा निभाव लागेल? ही चिंता तर वैश्विक आहे.

तरीही मला प्रचंड आनंद झालाय बाळा, तू आता स्वतःची एक अशी ओळख निर्माण करशील, या प्रवासात तुझ्या म्हनून काही वाटा असतील, तुझ्या आवडी-निवडी, सारं काही तुझं. तुझ्या स्वतःच्या विश्वातला तुझा पसारा. आणखी एक गम्मत सांगू, तुझ्या बरोबरच माझाही एक समांतर प्रवास सुरु झालाय बाळा, तुझ्या अनुभवांनी माझंही आयुष्य समृद्ध होत जाणार, बऱ्याच नव्या गोष्टी कळत जातील या प्रवासात. तुला तुझं असं काही मिळवण्यासाठी सोबत करताना, तुझी काळजी करतानाच तुझ्या पंखात बळही भरायचं आहे. बाळा, या प्रवासात एक आई म्हणून तुला मी काय शिदोरी देऊ? असा काहीसा एक विचार कधीतरी केलाही मी. पण आपल्या दोघींमधलं नातं मार्गदर्शक – शिष्य असं काही असण्यापेक्षा आपण सोबतच करूयात का हा प्रवास? दोघिही चुकत जाऊ, ठेच लागून पुन्हा शहाण्या बनू. म्हणजे पडून पुन्हा सावरताना पुन्हा चालायचं बळही आपसूक येत जाईल.

बाळा, आता तू ज्या वयात आहेस ते खूप नाजूक आहे, अलवार आहे. सगळं छान छान आणि सुखाच्या वाटा असणारं आहे. तुझ्या नजरेला जे जे दिसतंय त्यावर तुझ्या चांगल्या आणि कपट विरहीत नजरेचा चष्मा असणार आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुला चांगलीच वाटणार. आणि एक आई म्हणून मी कायम प्रार्थना करत राहीन कि प्रत्येक गोष्टीतली फक्त चांगलीच बाजू तुझ्यासमोर येवो. वाईटाचा तुला स्पर्शही नसावा. पण बाळा, प्रत्यक्षात हे एवढं सहज सोपं असतंच असं नाही बरं. जग आपल्याला जाणीव करून देतंच याची. मोठं होण्याच्या प्रवासात कळत जातील तुला हि ही वळणं. सध्यातरी तुझ्यातला आशावाद जिवंत राहणं महत्वाचं. मनू, सतत ऑप्टीमिस्टिक राहा. एवढंच म्हणेन, जग फक्त चांगल्या किंवा फक्त वाईट गोष्टीचंच नाहीये. चांगलं – वाईट या दोन्ही गोष्टी हातात हात घालूनच येतात. या प्रवासात कधी वाईट प्रसंग येतील, कधी दुखावणारे तर कधी उपहास, अपमानित करणारे प्रसंगही असतील, अशावेळी डगमगू नकोस, या गोष्टीना सामोरं जाताना शरीर, मन आणि बुद्धी कायम सुदृढ ठेव. आणि चांगल्या गोष्टींचा स्वीकार खुल्या मनानं करायला शिक. चांगलं मैत्र जोड, एखादी कला जोपास. आयुष्य समृद्ध करणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्यांचा शोध घेत राहा. स्वतःला कायम घडवत राहा.

तुझा हा प्रवास अनेक उत्तमोत्तम क्षणांनी बहरत जावो. खूप खूप शुभेच्छा.

तुझीच मम्मा 🙂

Posted in पत्रं - एक संवाद, श्रावीला लिहिलेली पत्रे, हिंदोळे मनाचे | Tagged | 2 प्रतिक्रिया

Happy Birthday…. :)

जगण्याच्या प्रवासातला हरेक क्षण कधी आठवण बनून तर कधी अनुभव बनून राहतात. कधी या रम्य क्षणांचं कोलाज आयुष्य रंगीबेरंगी करतात तर कधी हातात हात घालून आयुष्याची चढण सुसह्य करतात. आता जगलेला क्षण पुढच्या क्षणी आठवण बनून उरतो. अशाच अनेक क्षणांना कायमचं ‘पॉज’ करून ठेवता आलं असतं तर किती बरं झालं असतं असं अनेक वेळा वाटायला लावणारे कित्येक क्षण आपल्या ओंजळीत सामावलेले असतात. यातले कित्येक क्षण अगदी जसेच्या तसे नाही तरी काही प्रमाणात नक्कीच जपून ठेवले जातात. आनंदाने बेभान होणारे क्षण असो की जगणं एक कसोटी वाटायला लावणारे दिवस असो, एकदा हे क्षण ओसरले की त्याकडे एका तटस्थ दृष्टीने बघण्याचा स्थितप्रज्ञपणा आपसूकच येत असावा. आपल्याच आयुष्यात एक त्रयस्थ बनून फेरफटका मारण्याची सोय फक्त माणसालाच आहे, आहे की नाही गम्मत? अशाच एका क्षणी आठवणींच्या साठवणीसाठी लिहिती झाले आणि हा ब्लॉग बनवला गेला. वेळ जात राहिला आणि अनेकानेक आठवणींची स्मरण साखळी गुंफत गेली.
 
आज या माझ्या ब्लॉगचा पहिला वाढदिवस. आज मागे वळून पाहताना एक वेगळीच पण आतून सुखावणारी गोड स्पंदनं मनात दाटताहेत. या ब्लॉगनं मला नेहमीच चैतन्य दिलंय. मला व्यक्त होण्याचं हक्काचं ठिकाण दिलंय. माझ्या आयुष्यातील अनेक क्षणांना माझ्या सोबत तितक्याच उत्कटतेनं जगणारा हा मूक सवंगडी कायमच आनंद देणारा होता. कधी आवेगानं एखादा क्षण उसासून जगताना अथवा कधी बोचणाऱ्या
क्षणांशी दोन हात करताना कायमच याचा आधार वाटत राहिलाय. कधी कधी वाटायचं, की व्यक्त होणं आपली आवड आहे की ती गरज बनत चाललीये? कुठल्याही गोष्टींवर इतकं इमोशनली डिपेंड असणं कितपत योग्य आहे पण आज या वळणावर असं वाटतंय हा ब्लॉग माझ्या आयुष्यातील सुंदर क्षणांचा अल्बम आहे जो केव्हाही चाळला तरी त्यातून गत क्षणांचा मंद सुवास कायम दरवळत राहतो.
 
आज स्वतःलाच आश्वासन देतेय… व्यक्त होत राहण्याचं… आणि आला क्षण भरभरून जगण्याचं ….
 
 
 
Posted in हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा

मला भावलेले ग्रेस . . .

कॉलेजमध्ये असताना जे जे आवडेल ते नोंद करून ठेवायची सवय कधी न कधी
आपल्याला लागलेली असतेच. मी ही अपवाद नव्हतेच त्याला. 🙂 त्यावेळी झपाटल्यासारखी
पुस्तके पाडायचा नाद लागला होता आणि वयही असंच इवल्याश्या गोष्टींनी डोळा पाणी तरारण्याचं. मग काय नोंदवही भरून न वाहती तरच नवल :). काल सहजच हा खजिना
चाळला तेव्हा अनेक मोरपिसं अंगावर फिरल्यासारखं वाटलं. पुन्हा एकदा त्या वयातली
धुंदी अनुभवल्या सारखं वाटलं. तेव्हा जिवाभावाच्या मैत्रीबरोबरच ह्या शब्दाबंधानेही
जगण्यावर गारुड केलं होतं हे नक्कीच.
 
आत्म्यांच्या अलौकिक जवळकीलाही सीमा असतात,
कधी नुसतेच देहावरचेच खाच-खड्डे, डाग दिसतात
अशा वेळी करशील काय? सोडून देशील हातचा हात?
अशरणतेने रडशील की अभिमानाने असशील ताठ?”
 
शांताबाई तर तेव्हा तिन्ही-त्रिकाळ सोबतच असलेल्या मैत्रीणीसारख्या शब्दांसवे सोबत करत असायच्या. वसंत बापट, मंगेश पाडगांवकर, यांबरोबरच ‘ग्रेससारख्या’ मूर्तिमंत दुर्बोधतेला हात लावायचं धैर्य आलं ते त्यातल्या गेयतेमुळे. तेव्हा ‘ग्रेस’ कळू लागला यापेक्षा तो वाचता येऊ लागला ह्याचंच जास्त अप्रूप होतं. चंद्र-माधवीचे प्रदेश, संध्याकाळच्या कविता, दुर्बोध होत्या तरी मंत्रमुग्ध करणाऱ्या होत्या हे निश्चित. ‘भय इथले संपत नाही’ असो किंवा ‘ती गेली तेव्हा’, शब्दांत गुंतणे म्हणजे काय याचं एकमेव उदाहरण म्हणजे ग्रेस.
 
मुळात ‘डॉ. माणिक गोडघाटे’ असं नाव असणारा हा माणूस ‘ग्रेस’ या नावाने कविता लिहितो तेव्हा याचं कुतूहल नक्कीच होतं की नक्की काय असेल या नावाचं मनोगत? ‘ग्रेस’ ही
वृत्ती म्हणायची की मनस्विता जी प्रत्येक प्रतिभावंत याचं अवगुंठन लापेट्ताना दिसतो.?
 
जीव राखता राखता तुला हाताशी घेईन
झडझडीचा पाऊस डोळे भरून पाहीन
 

तुझे सोडवीन केस त्यांचा बांधीन आंबाडा
देहझडल्या हातांनी वर ठेवीन केवडा

तुझे मेघमोर नेसू तुला असे नेसवीन
अंग पडेल उघडे तिथे गवाक्ष बांधीन

दूध पान्ह्यात वाहत्या तुझ्या बाळांच्या स्तनांना
दृष्ट काढल्या वेळेचा मग घालीन उखाना

तुझे रूप थकलेले उभे राहता दाराशी
तुझा पदर धरून मागे येईन उपाशी

तुझ्या चिमण्यांची जेव्हा घरी मळभ येईल
वळचणीचा पाऊस माझा सोयरा होईल

भाळी शिशिराची फुले अंगी मोतियांचा जोग
तुझ्या पापण्यांच्या काठी मला पहाटेची जाग

नाही दु: खाचा आडोसा नको सुखाची चाहूल
झाड वाढता वाढता त्याने होऊ नये फूल

त्यांचं काहीसं अलिप्त असणं, स्वमग्न म्हणावं इतपत समाजापासून राखलेला सुटवंगपणा जो की त्यांच्या कवितेतही झिरपत असायचा. यामुळे ग्रेस सतत हुलकावणी देत राहिले. त्यांची कुठलीही कविता वाचायला घ्यावी आणि ती पहिल्याच प्रयत्नात समजली असं कधी घडतच नाही. एखादी ओळ कुठे समजतेय असं वाटलं नी जरा हुरुळून जावं तर पुढची ओळ पार ठेचकाळून सोडणारी असते. बरं एक दोन रचनांत असे घडते तर चालले असते पण त्यांची प्रत्येक कविता दुर्बोधतेच्या मुशीत घडवल्यासारखी नित्य अनोळखीच वाटत राहते. म्हणूनच की काय, इतक्यावेळा वाचुनही ‘ग्रेस’ पुरता कळलाय असं म्हणूच शकत नाही. हेच त्याच्यातल्या काव्यतेचं यश म्हणावं का?
 
ग्रेस यांची कविता कवेत घेता येण्यासारखी नाही, ग्रेस यांच्या कवितेचा प्रातिभ आवाका समोरच्याची कल्पनाशक्ती शरणागत करण्याइतका मोठा आहे यात काय शंका? तरीही ग्रेसचं गरुड कणभर ही उणावत नाही.
 
“कलता दिवस, त्यापुढे बावरलेली
संध्या आणि रात्रीचे पालाण
पडण्याअगोदर गाठायला गाव!
अशीच ‘वैष्णवी’ नित येत राहिली…
मलाही नेत राहिली, नेत राहील
एकतारीवर.”
 
साधारणतः एखादी कलाकृती त्याच्या निर्मिकाचीच प्रतिकृती असते असं म्हणतात. पण ग्रेस याला अपवाद असावा. कविता कागदावर उतरली की ग्रेस अन कवितेची नाळ विलग होते. ‘कविता लिहिल्यानंतर मी तिचा राहत नाही’. हे त्याचं मनोगत याची साक्ष देत जातं. ‘सांध्यपर्वातील वैष्णवी’ तील त्यांचं हे आत्मनिवेदन पुरेसं आहे त्यांना जाणून घेताना. ग्रेस च्या कवितांची तटबंदी भेदताना आपण ठेचकाळतो, पुन्हा-पुन्हा घायाळ होतो. एखादी गोष्ट हाती लागत नाही म्हणल्यावर येणारं अधीरपण जाणवून आपण कष्टी होतो. ‘ग्रेस’ ची कविता अशीच आहे अभेद्य आणो तरीही खुणावणारी. म्हणूनच आपण ग्रेसच्या
कवितेत गुरफटून जातो. फसव्या चकव्यामागे उरी पोटी धावत जातो.
 
 
“जोडव्याच्या जोडालाही
डोह घाली धाक
कुंकवाच्या करंड्यात
बाभळीची राख”
 

पाठीमागे उभा त्याचे
दिसेल का रूप?
आरशाच्या शापानेही
आलिंगन पाप

रानझरा ओळखीचा
तहानेची बोली
कात टाकलेला साप
पाचोळ्याच्या खाली.
 
कृष्ण- राधेच्या नात्याची शाश्वत खोली उलगडावी ती ग्रेसनंच
 
“असतील लाख कृष्ण कालिंदीच्या ताटाला
राधेस जो मिळाला तो एकटाच उरला!”
 
किंवा मग संध्याछाया दाटून आल्यावर होणारी अनाकलनीय तगमग व्यक्त करणं….

“घर थकलेले संन्यासी, हळू हळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यांमधले नक्षत्र मला आठवते

ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते
ढग ओढून संध्येवाणी आभाळ घसरले होते

पक्षांची घरटी होती ते झाड तोडले कोणी
एकेक ओंजळी मागे असतेच झर्‍याचे पाणी

मी भिऊन अंधाराला अडगळीत लपुनी जाई
ये हलके हलके मागे त्या दरीतली वनराई”.

दुःखाचेही सुरेल गीत गाणारा हा मनस्वी कवी, शब्दांच्या दुनियेत मुक्त मुशाफिरी करणारा मस्तमौला अशा अनेक नावांनी परिचित असे ग्रेस. ग्रेस हीच एक भाषा आहे. त्यांची ती विशेषणे, क्रियापदे, समास, संधी इतरत्र नाही आढळणार. वाचून वाचून देखील कित्येकदा त्यातून मधुर नादाखेरीज काही सापडत नाही एकास एक अर्थ शोधायला गेले तर. त्यांनी वापरलेल्या प्रतिमा तर वाचकाला अस्वस्थ केल्याशिवाय सोडत नाहीत.
 
ग्रेसच्या कविता म्हणजे ओल्या रेतीवर उमटलेल्या पाऊलखुणा. त्यांचा मागोवा घेत घेत आपण हरवत जातो एका अज्ञाताच्या प्रदेशात जिथे आहे गूढता आणि नादावले पण . जिथला काळा अंधारही आपणास खुणावत राहतो त्याच्या फटींत चाचपडण्यासाठी. आणि हाती ठेवत जातो गंधगार सावल्या अस्वस्थाच्या. त्याला कोणी समजूच नये किंवा तसा प्रयत्नही करू नये. फक्त काळीज कोडी मांडत राहावी त्याला हाताशी धरून.
 
 
-श्रद्धा
 
(ता. क. : चित्रे वरून साभार.
माहिती स्त्रोत: गुगल, विकिपीडिया व आंतरजालीय लेख).
 
 
Posted in हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा

कविता

रात्रीच्या गूढ गर्भात विरत जाणाऱ्या
चाहुलींच्या गर्द वाटा….
अस्पष्ट लयीत घुमत जाणारा
श्वासांचा हिंदोळा ….
 
देहभर उमटत जातात स्पर्शांचे कवडसे
लखाकून उठतो गात्रांत थिजलेला अस्फुट पारा
खिडकीशी चंद्र घुटमळतो थोडा
रातराणीही वाटते थोडीशी हळवी….
 
आत आत खोलवर डुचमळत रहातात
आसुसलेले वेडे बहाणे….
दिठीची कुंपणे ओलांडून निसटून जातात
काही हळवे उमाळे….
 
विरत जातात जाणिवांचे प्रदेश
मनाचा पसारा विस्कटलेला….
चंद्र भाबडा लपेटून घेतो
थकली भागली सावळी पहाट….”
 
 
श्रद्धा
30.04.2013

 

Posted in कविता, हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा

प्राजक्त….

दारी उभा प्राजक्त
जडे सुवासाचे वेड
बहर चांदण्यातला
करी सुखाची शिंपण !!!
 
दारी उभा प्राजक्त
जणू जिवाचा जिव्हाळा
सख्या साजणाची सय
मन पाखरू वेल्हाळ !!!
  
दारी उभा प्राजक्त
श्वास गुंतला मारवा
मंद मंद सुवास
धुंद जगण्याचा सूर !!!
 
दारी उभा प्राजक्त
लेऊन चांदण लेणं
देई सुवासिक लेणं
परी पुन्हा विरक्त !!!
 
 
 
Posted in कविता, हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा

जागतिक महिला दिन

women's day

नेहेमीप्रमाणेच या वर्षीचा मार्च उगवताना जागतिक महिला दिनाचं बिगुल वाजू लागलं आणि नेहेमीच्याच परंपरेप्रमाणे चार-दोन भाषणं, एक दोन नवीन विधेयकांची खिरापत आणि अशीच चार दोन फुटकळ आश्वासनं यांचा उहापोह झाला. खुद्द महिला ही या दिवसाला आणखी एका सेलिब्रेशन चा योग म्हणूनच बघताना दिसतात. या दिवशी नवऱ्याकडून एखादा लाल गुलाब किंवा तत्सम एखादी भेटवस्तू मिळाली की आजचा दिवस सार्थकी लागल्यासारखा वाटतो पण खरंच किती स्त्रिया आणि पुरुषांना या दिनाचं किंबहुना या संकल्पनेचं मर्म उमगलेलं दिसतं? केवळ एक दिवसच या संकल्पनेला महत्व द्यायचं, की बाकीचे दिवस आपण कळत-नकळत या संकल्पनेला आपल्या सोयीनुसार बगल देत जातो याचा विचार कोणी आणि कसा करायचा? यात फक्त पुरुष वर्गालाच टार्गेट करण्याचा हेतू नसून स्त्रियांची आत्मघातकी वृत्ती, कल्पनातीत मुखदुर्बळपणाही कारणीभूत आहेच. मुळात ज्या उदात्त हेतूने वगेरे प्रेरित होऊन या दिनाची सुरुवात झाली होती तो हेतूच आता शंकेच्या घेऱ्यात आहे.

स्त्री ही विधात्याने घडवलेली सगळ्यात चांगली गोष्ट असं सगळेच मानतात. रूप, बुद्धिमत्ता, पुरुषांच्या तुलनेत तिला मिळालेले सात गुण जास्त या एवढ्या जमेच्या बाजू असतानाही याच दैवानं तिला अनाकलनीय बंधनांच्या जंत्रीत का गुंडाळल आहे? एवढ्या मौलिक गोष्टी जवळ असताना त्याचा वापरच न करण्याची तिला करण्यात येणारी सक्ती हा कसला विरोधाभास? आजही काही कारणविवश एकटं राहावं लागणाऱ्या स्त्रीला समाजात मानानं जगता येत नाही. जगताना तिला पुरुषाचा आधार लागतो किंबहुना तो असावाच असा पुरुषी समाजाचा तिला धाक आहे. आज कित्येक स्त्रियांच्या नशिबी सिंगल पेरेंट म्हणून जगणं वाट्याला येतं यात स्वखुशीचा भाग असला तरी तो दरवेळी असेलच असं नाही. मग अशावेळी स्वत्व आणि आपलं वं आपल्या मुलांचं भविष्य अशा दुहेरी कात्रीतून जगण्याची जी जीवघेणी धडपड तिच्या वाट्याला येते याची जबाबदारी आपला तथाकथित समाज कितीवेळा पुढे येउन घ्यायची तयारी दाखवतो? मग कुठल्या आधारावर आपण असं म्हणायचं की आजची स्त्री सबल आहे? खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे. खरंतर समाजात स्त्री-पुरुष एकमेकांस पूरक असावयास हवे पण आज याचा समाजालाच काय पण खुद्द स्त्रियांनाच विसर पडलेला दिसतो. पण या तथाकथित श्रेष्ठ-कनिष्ठच्या वादात स्त्रियांचं समाजातलं स्थान नेहेमीच धोक्यात राहिलं आहे.

प्रत्येक देशाची जमीन वेगळी, हवामान वेगळं, संस्कृती वेगळी पण स्त्री-जीवन सगळीकडे जवळपास सारखंच आहे. प्रत्येकीला जीवनाच्या वाटेवर प्रवास करताना ठेच देणारे दगड तेच आहेत. फास टाकून जाळ्यात ओढणारे पारधी तेच आहेत आणि बाजारात नेउन विकू पाहणारे सौदागरही तेच आहेत. फरक कुठेच नाही आणि असलाच तर तो नावात आहे, गावात आहे, वर्गात आहे आणि धर्मात आहे. माणसानं दूध देते म्हणून गायीला तसंच मूल देते म्हणून बाईला बांधून ठेवलं. आपल्या गुलामगिरीत जखडून टाकलं. स्त्री म्हणजे कायम उपभोगाची वस्तू, पुरुषाच्या स्वामित्वाची निशाणी, ती त्याला हवीच असते त्याचं सामर्थ्य दाखवण्यासाठी. काळ बदलला, इतिहास बदलला पण पुरुषी वृत्ती मात्र तीच राहिली म्हणूनच कालची रिंकू पाटील ते आजची निर्भया यापर्यंतच्या सगळ्या दाहक कहाण्या याच वाटेने जाताना दिसतात. पुरुषांच्या भोगवादी, अहंकारी स्वामित्व भावना, पाशवी वृत्ती हेच या कहाणीचं मूळ आहे.

रामायणात लक्ष्मणाने आपल्या बाणाने सीतेला लक्ष्मणरेषा आखून दिली आणि ती न ओलांडण्याची दक्षता घ्यायला सांगितली. सीतेनं ती ओलांडली आणि रावणाने तिला लंकेला उचलून नेली. आजचा लक्ष्मण रामापेक्षा वेगळा झालाय. आजचा राम स्वतःहूनच संसाराला तिचा हातभार लागावा म्हणून लक्ष्मण-रेषेच्या बाहेर पडायला तिला प्रवृत्त करायला पहतो. आशावेळी ऑफिसा-ऑफिसा मध्ये बसलेले रावण सीतेला आपलीशी करू पाहत आहेत. आता युद्ध राम-रावणाचे नाही. सितेलाच रावणाभोवती ‘सीता रेषा’ आखावी लागणार आहे आणि रावणाचं आक्रमण थोपवावं लागणार आहे.

स्त्री-पुरुष एकमेकांना कॉम्प्लिमेटरी असावेत हे निसर्गदत्त आहे. दोघानाही एकमेकाची तितकीच गरज आहे. एकमेकांशिवाय दोघेही अपूर्ण आहेत. एकमेकांच्या भिन्नतेतच दोघांच्या जीवनाचा आनंद साठलेला आहे. असं असताना विवाहाच्या बाजारात पुरुष जणू स्त्रीवर मेहेरबानी करतो हि प्रवृत्ती का? मुलीचा बाप आजही हुंडा देताना अजिजी करतो. वधू-पित्याने पैसे दिले नाहीत म्हणून आजही कित्येक सुना जिवंत जाळल्या जातात. आणि वर याविरुद्ध चकार शब्द ही कुठे बोलला जात नाही. यामागे तिच्या मानसिकतेचाच भाग जास्त आहे. सासरच्या, नवऱ्याच्या छळाला तोंड देणं हेच आपलं कर्तव्य आहे आसंच मुलींना वाटत राहातं. लहानपणापासून हीच तर शिकवण तिला दिली जाते.

कौमार्य अवस्थेत मुलीचं वाकडं पाउल पडलं की छाती पिटून रडणारे आई-वडील ती वयात येत असताना तिला लैंगिक शिक्षण मिळावे यासाठी ते किती जागरूक होते हे कोण विचारात घेतो? बरं, मुलीच्या वाकडं पाऊल पडण्यात तिच्या इतकाच तो मुलगाही जबाबदार आहे हि गोष्ट कितीजणांना महत्वाची वाटते? या सगळ्यात मुलगा उजळ माथ्याने वावरू शकतो पण मुलगी मात्र जन्मभराचा डाग वागवत जीणं कंठते. शहरांच्या विस्तारीकरणाने अनेक प्रश्न जन्माला घातले. त्यातच निर्माण झालेला आधुनिकीकरणाच्या तलम वस्त्रातून उदयाला आलेल्या भोगवाद, चंगळवाद यामुळे सामाजिक मान-सन्मानाच्या साऱ्या संकल्पनाच बदलत चालल्या आहेत. या चंगळवादाचं प्रतिनिधित्व पुन्हा शिताफीने या स्त्री-वर्गाकडेच देऊन समाजाने स्वतःची कातडी वाचवली आणि स्त्रिया वरवरच्या चकचकाटला बघून हरखल्या. एखाद्या सुटिंग-शर्टिंगच्या जाहिरातीत सुटाबुटातला पुरुष आपल्याभोवति चार-दोन स्त्रिया घेऊन उभा असलेला दाखवला जातो हे कशाचं प्रतिक आहे? हेच जर एखाद्या स्त्रीचा मोठेपणा दाखवण्यासाठी आजूबाजूला चार पुरुष तिचे सांडल पुसत आहेत हे दाखवलं तर ते पुरुष वर्गाला रुचेल काय? पुरुषांना तो अपमान वाटेल मग स्त्रियांना तो का वाटू नये हा प्रश्न आहे. आज उद्योगधंद्याच्या स्पर्धेत वशीकरणासाठी स्त्रीचा वापर केला जातो. मुळात आपल्याला असं विकावू नाणं करून घ्यायचं आहे का याचा स्त्रीनंच विचार करायला हवा.

आजच्या स्त्रियांचे प्रश्न केवळ हुंडाबळी, अत्याचार एवढ्यापुरतेच मर्यादित नसून यापुढे ते अधिकाधिक जटील होत जाणार आहेत. म्हणूनच स्त्रीच्या मानसिकतेची बैठक नव्याने निर्माण करावी लागणार आहे. स्त्री सर्व काही बदलू शकते पण निसर्गदत्त जबाबदारी ती टाळू शकत नाही. तिला एका नवीन मानदंडाची स्थापना करावी लागणार आहे जो या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत तिला सन्मानानं जगण्याचा हक्क मिळवून देईल, तिचा विकास साधता येईल. या प्रवासात पुरुष फक्त शत्रू-पक्षाच्या सीमेवर न राहता सहायक म्हणूनही असू शकतो ही शक्यता नाकारता कामा नये. कारण म. फुले, आगरकर हे ही पुरूषच होते, इंद्राच्या अपकृत्यामुळे शीला झालेल्या अहिल्येला पुन्हा संजीवनी देणारा राम हा ही एक पुरूषच होता हे विसरत येणार नाही. स्त्रीने स्वतः बदलावच पण त्याच बरोबर पुरुषाला बदलण्याची कामगिरीही तिलाच करावी लागणार आहे. स्त्रीच्याच कुशीतून जन्माला येणारा पुरुष पुढे चालून तिलाच गुलाम करू पाहतो ही मानसिकता कशी फोफावते? ती निर्माण व्हायला स्त्रीच जबाबदार नाही का? मुलीच्या वाढवण्याच्या वेगळ्या संकल्पना आणि मुलाला वाढवताना वेगळे मापदंड हे समीकरण बदलायला हवे. मुलीवर अत्याचार होऊ नये म्हणून तिने काय करावे काय नाही याची जंत्री तिच्या गळ्यात अडकवण्याआधी या अत्याचाराला कारणीभूत ठरणाऱ्या किंवा ठरू पाहणाऱ्या मुलाच्या आई-वडिलांनी आपल्या मुलाला काय करू नये याचे धडे निश्चितच द्यावेत जेणेकरून स्त्री ही केवळ भोग्य नसून ती ही एक सन्मानीय आयुष्य जगण्याचा पुरेपूर अधिकार असलेली एक व्यक्तीच आहे याची जाणीव समाजात कायम झिरपत राहील.

या प्रवासात स्त्रीनं स्वतःच सामर्थ्य ओळखून आपला प्रवास ठरवायला हवा. या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेचा वेग अति प्रचंड आहे त्याच्याशी जुळवून घेताना आपल्या मध्ये कित्येक नव्या गोष्टींची जपणूक करावी लागेल. संघटीत होणं हाच या प्रवासाचा मंत्र हा मार्ग सुकर करेल. तरच महिला दिन साजरा करणं प्रस्तुत वाटेल किंबहुना तो साजरा करण्याची गरजच पडू नये अशी अपेक्षा. 🙂

महिला दिनाच्या संघटीत शुभेच्छा!!! 🙂

 
 

* या वर्षीच्या महिला दिना निमित्त ऑफिसच्या ‘एमप्लॉयी कॉर्नर’ मध्ये मी लिहिलेला लेख इथे देत आहे.

 

Posted in हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा