तन्वीच्या ब्लोगवरील हि पोस्ट जशीच्या तशी रिब्लॉग करतेय. स्वतःच्या अत्यंत सुरक्षित कवचातल्या आयुष्यातून थोडं बाहेर डोकावण्याचा यथाशक्ती-यथामती केलेला हा छोटासा प्रयत्न

Advertisements
Posted in हिंदोळे मनाचे | यावर आपले मत नोंदवा

तू – मी

तू – मी
 
तू तिथे, मी इथे,
वेगवेगळ्या ग्रह गोलांवर
वसती करून आहोत आपण
मनात दाटलेले शंकांचे मळभ
अजूनच धुसर करतायत वाटा
आपल्या मधल्या…
 
तुझ्या-माझ्यातील एकेक
कडी निखळताना सुटणारे
निःशब्द हुंकार पोहचत असतील का रे तुझ्यापर्यंत?
का तू तुझ्याभोवती गुंडाळलेली निर्वाताची पोकळी
अजूनही शाबूत आहे?
 
तू म्हणायचास मला, ‘इमोशनल फुल’ आहेस तू
मी ही हसून परतवायचे डंख तुझ्या शब्दांचे,
खोल जखम होता होता वाचली कारण
फक्त या ‘फुल’ चा अर्थ तुला पाहिजे तसा घेतला नाही मी,
 
कोण जाणे आता पुन्हा केव्हा या वाटा एकत्र होतील,
पुन्हा केव्हा हाती आपले हात असतील,
पण तोपर्यंत एकमेकांच्या स्मरणातलं
चांगुलपणच जपावं, झालं.
 
Posted in कविता, हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा

दवबिंदू……

एक दवबिंदू….
हळूच पानावर बसला
छान छान दिसायच्या नादात
वहयाचंच विसरला
 
 
सूर्याकडे एकटक बघताना
स्वतःलाच विसरून गेला
स्वप्नांच्या दुनियेत
जगणंच हरवून बसला
 
सूर्याच्या तेजात जेव्हा
होरपळू लागला
दवबिंदू तेव्हा परतीच्या
वाटेला लागला
 
 
परतीच्या वाटेवर येताना
दवबिंदू थकून गेला
हवेच्या एका झोक्याने
तिथेच विरून गेला.
 
 
Posted in कविता, हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा

प्रिय श्रावी,

आठवतं तुला? २ दिवसांपूर्वी मी खूप अस्वस्थ होते. माझा मूडच नव्हता अजिबात. सवयीने कामं उरकत होते खरं पण मन थाऱ्यावर नव्हतं हे जास्त खरं. रात्री झोपायला गेलो तेव्हाही हा अस्वस्थपणा माझी पाठ सोडत नव्हता. तुझी झोपेची तयारी करता करता कदाचित तुलाही हे जाणवलं असावं की मम्मा नेहेमीप्रमाणे हैप्पीवाल्या मूड मध्ये नाहीये. तू गप्पच होतीस. एरवीचा दंगा, अखंड बडबड, मला या नं त्या कारणानं हजारो प्रश्न विचारून भंडावून सोडणं यापैकी काहीच नव्हतं. मी स्वतःच एवढी गर्क होते माझ्या विचारांच्या आंदोलनांत. खरं सांगते पिल्ला, तुझ्याकडे लक्षच नव्हतं माझं. मी नेहेमीप्रमाणे ‘चल झोप आता’ असं म्हणल्यावर तूझा ‘मम्मा, आज कोणती गोष्ट? हा प्रश्नही आला नाही, मुकाट्यानं डोळे मिटून घेतलेस तू. हात नेहेमीप्रमाणेच तुझ्या डोक्यावरून फिरत होता. थोडावेळ तू अशीच शांत पडून राहिलीस. मला वाटलं झोपलीस तू म्हणून मी कूस बदलली.

आणि जणू मी मोकळी सापडायची वाट बघत असल्यागत विचार पुन्हा प्रकट झाले. इतका वेळ माझ्या ताब्यात असलेलं माझं मन मग विचारांच्या या कुंपणावरून त्या कुंपणावर धावू लागलं. घरातलं आजारपण, नोकरी, घरातलं सगळं नियोजन, तुझं रुटीन, भरीसभर घरातले माणसांचं सतत अनप्रेडिक्टेबल असणं, सततचा मानसिक ताण यांनी खरच थकून जायला झालं होतं. गेल्या काही दिवसांमधल्या खूपशा घडामोडी डोळ्यांसमोर तरळत होत्या. त्यातल्या बऱ्याचश्या हळव्या नी बऱ्याचश्या दुखावणाऱ्या क्षणांना मनाने केव्हाच कुरवाळायला सुरुवात केली होती. डोळे नकळत वाहत होते. प्रचंड हतबल आणि निराश वाटत होतं. अचानक तू वळून मला म्हणालीस, मम्मा? तू रडतेश? क्षणभर दचकलेच मी. क्षणात माझ्या चेहऱ्याने खोटा मुखवटा ओढण्याची लगबग केली. “नाही रे पिल्ला”, मी कुठे रडतेय? पण पिल्ला तू पकडलस मला. माझ्या बाजूला येउन तू म्हणालीस पण. “मम्मा तू रडतेश”. एवढी सरळ-सरळ कोंडीत पकडले गेले होते नं मी. बचाव कसला केला असता मी?

काही न बोलता मी तुला जवळ ओढलं नि हमसून हमसून रडायला यायला लागलं मला. तुला जाणवलंच होतं काहीतरी बिघडल्याची. तू ही स्तब्ध राहिलीस. मम्माच्या मनातलं भरून आलेलं आभाळ रितं होईतो.

मम्माआपण खेलुत कामी तुला बेटा – बेटा म्हणणार. तू मला सांगायचं, तुला कोणी मारलं ते हं ? चल.

मग नेहेमीप्रमाणे माझ्या गळ्यात हात घालून तू विचारलंस, बेटा काय झालं? कशाला ललती? तुला कोणी मारलं?

मी हि नेहेमीचं उत्तर दिलं, मला बाऊ ने मारलं. मग तू त्या बाऊला ओरडलीस, का रे बाऊ  माझ्या बाळाला मारतोस? जा तिकडे. आणि मला म्हणालीस, मम्मा, बाऊ गेला आता रडू नकोश हं?

पिल्लू, त्याक्षणी आणखीच जडावलं ग माझं मन. वाटलं, आईच आहे समोर. मी अस्वस्थ असताना तिचं न

सांगता ओळखणं. अन असंच हळूच त्याला वाट करून देणं आठवलं. त्याक्षणी पिल्ला तू माझी आईच झाली होतीस गं. भलेही पद्धत वेगळी पण उद्देश एकच.

गेल्या काही दिवसांपूर्वी आपले अण्णा आजारी पडले. सतत कोणीतरी माणूस जवळ लागायचं त्यांना. त्यामुळे आजी त्यात गुंतली. मी अन बाबा, नोकरी सांभाळत जमेल तसं करत होतो त्यांचं. ह्या अचानक घडलेल्या घटनेमुळे तुझं रुटीन मात्र बिघडलं. आजीला तुझ्या शाळेच्या वेळा सांभाळणं जमेनासं झालं. म्हणून मग पर्यायी व्यवस्था म्हणून तुला शाळेतून परस्पर नानीकडे जायला लागू लागलं. २-३ दिवस तू ही खुश होतीस या बदलामुळे. पण सलग एक आठवड्यानंतरही जेव्हा हे कंटिन्यू राहिलं तेव्हा मात्र तू नाराजी नोंदवलीस. रोजच कशाला जायचं नानीकडे? म्हणून. नानीचं घर काही नवीन नव्हतं. तुलाही आवडायचं तिथे. पण बदल नक्कीच होता. तेव्हाही फक्त तुला एकदाच समजावलं. तुला जाणवून द्यायचा प्रयत्न केला कि काय अडचण आहे ते. त्यानंतर मात्र तू कधीही याबद्दल विचारलं नाहीस. जो बदल स्वीकारताना आम्ही अजूनही अडखळत होतो, त्याचा तू केलेला समंजस स्वीकार पाहून खूप अभिमान वाटला रे पिल्ला तुझा.

समोरचं ते इवलसं पिल्लू ज्या सहजतेनं परस्थितीशी जुळवून घेत होतं ते ग्रेटच होतं. बरोबरच आहे, हे तुला जमलं कारण अजून तू खूप निरागस आहेस नं एकदम. रूढ जगातल्या फुटपट्ट्या तुला खरं वागण्यापासून रोखू नाही शकत. तुझं नितळ मन तुझं वागणं किती प्युअर करतात.

पिल्लू, आम्ही मोठी माणसं हे कुठेतरी विसरलोय का रे?

एका आईच्या नजरेतून मी विचार करत होते तुला अचानक तुझं जमलेलं रुटीन बदलायला लागणार. एक नवं रुटीन तू कितपत जमवून घेशील? तू कशी react करशील याचा. पण तू किती सहज हे स्वीकारलंस? खूपच अनपेक्षित असताना. की मीच अनभिज्ञ होते तुझ्या या पैलू पासून?

बाळा, एक आई म्हणून मी नक्कीच सुखावलेय. माझ्या पिल्लाच्या संवेदनशीलतेमुळे. माझं पिल्लू तयार होतंय बदल पचवायला. तेही मनाची हळुवार वीण कुठेही न विस्कटता. 🙂 बाळा, अशीच जप ही संवेदना. जपशील नं?

श्रद्धा

सोमवार, 14 जानेवारी 2013

 

Posted in हिंदोळे मनाचे | Tagged | 2 प्रतिक्रिया

शिशीर ऋतूच्या पुनरागमे…..

 

रात्री प्रदीर्घ झाल्या की हिवाळ्याची चाहूल लागते. नुकत्याच होऊन गेलेल्या पावसात सुस्नात होऊन गेलेली सृष्टी धुक्याची झिरझिरीत चुनरी पेहरून सज्ज होते. सुरंगी गाताना लोभवणारे राघववेळेचे प्रहर जागे होऊ लागले व गंधगाररात्रीच्या लांब कृष्णसावल्या सरपटू लागल्या की शिशीर आगमनाची ग्वाही मिळते. हवेतला गारठा आणि हाडांपर्यंत पोहोचणारे थंड गार वारे आपलं अस्तित्व हलके हलके जाणवू लागतात. कापसागत भुरभुरणारं दंव इथे-तिथे सांडत साऱ्या वाटा धुक्यात बुडू लागल्या की शब्दांचंही धुकं होतं आणि मनातलं गाणं मुकं होतं. मग सुरु होतो आपलाच आपल्याशी संवाद. एरवीच्या दैनंदिन जीवनात ऋतूने बदललेली कूस कशी उमजावी?

दूर मंदिरात होणारा घंटारव, काकडारतीचा गजर, सावळ्या विठ्ठलाची शुचिर्भूत होउन भक्तांच्या मेळाव्यात स्थानापन्न होण्याची लगबग, आळसावलेल्या सूर्याचे लाडिक आळोखे-पिळोखे, नुकताच उमलू लागलेला रानगंध शिशीर आगमनाची वार्तादेऊ लागतात.

 नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली
दवांत भिजल्या रस्त्यावरती किरणांची रांगोळी…
 

‘मासानां मार्गशिर्षोSहम’, गीतेत उल्लेखलेला, रामायणात गौरवलेला इष्ट ऋतू. इष्ट पण कशासाठी, बहरून येण्यासाठी की सरते बहर जपण्यासाठी? केशरांचे दिवे अंगी पेटवण्यासाठी येणारी हि गुलाबी थंडी सांद्र ओढाळ आठवणींचे दुःख मागे झरत ठेवून जाते.

स्मरणाचे उत्सव तेवत ठेवण्यासाठीचा हा मंद-मधुर मास. त्या धुकेरी अंधारात स्मरणाचे मणीच हाती गवसत नाहीत. भरभरून सांगू पाहणारे सारे जुने गोड संदर्भ परक्या लिपीसारखे अनोळखे होतात. रोजच्या चक्रात गरगरताना गवसणीतील संवादिका मग अचानक गुलबकावली होऊन हाती येते अन आपसूकच हरखून जायला होतं.

पण हिवाळ्यातल्या रात्री फार सुंदर असतात. कृष्णसावल्यांनी व्याप्त प्रदीर्घ रात्री. पौर्णिमेचा नखरा उतरून टाकणाऱ्या व रात्रभर आभाळात चंदेरी कलाबतूचे कण सांडत चमचमत राहणाऱ्या लक्षावधी चिमुकल्या चांदण्या. मनाला भुरळ घालणारी बदामी चंद्रकोर आभाळाच्या निळाईत विलसत राहते. रानावनातून, शेताभातातून भरून राहिलेला गव्हाच्या ओंब्याचा मादक गंध. तळ्यातली लाल-निळी कमळं. सरत्या हेमंतात मात्र जादूची कांडी फिरवावी तशी तळ्यातली सारी कमळं गायब होऊन जातात आणि शिल्लक राहतात कमळाच्या देठासारख्या लांबलचक खोलवर पसरलेल्या शिशिरातील रात्री. चकवा लावणाऱ्या, भुलभुलय्यात घेऊन जाणाऱ्या. दंवांचे गजरे गुंफता यायचं हळवं वय सरलं तरी जाणत्या वाटा स्मरणात निरंतर टकटकतात. मनात झुलत राहते घरामागच्या टेकाडावरची चवऱ्या ढाळणारी शिरीषाची डेरेदार रांग. दारी झुलणारी शुभ्र कुंदांची भरगच्च कमान. पिवळ्याधम्म पायांच्या साळुंख्या आणि कलत्या संध्याकाळी एका रेषेत परतणारे गर्द राव्यांचे थवे. दिवस-रात्र टपटपणारी पिवळट तपकिरी पानं, अन उघडी बोडकी होत जाणारी निष्पर्ण झाडे पाहिली की कॉलेजात असताना निरर्थक वाटलेल्या ओळी मग पाठलाग करत येतात.

 “शिशीर ऋतूच्या पुनरागमे
एकेक पान गळावया
का लागता येतसे मज
नकळे उगाच रडावया”
 
 

पण उडून गेलेली इवली सुकुमार पाखरे घरट्यात परतणार नाहीत हे कुठंतरी उमजत जातंच. शिशिरातल्या हरेक कृष्णमेधावी कातरवेळी ह्या वाटा तुडवणं मग अपरिहार्यच बनतं. निळ्याभोर दिशांमधून पिसासारखी तरंगणारी घननीळ चव रात्रीच्या सुरईत भरून आयुष्याची झिंग गात्रांत साठवण्याची धडपडही व्यर्थ वाटू लागते. दाटून येणाऱ्या हिवाळ्यातील मायावी गर्द लांब लांब सावल्यांवर, ठसठसणाऱ्या खोल जखमांवर मेहंदी हसनचे सूर, गुलाबपाणी शिंपडत जातात.

 “थंडी सर्द हवां के झोके
आग लगाकर छोड गये
गुल खिले शाखोपर नये
और दर्द पुराने याद आये”
 

त्यासरशी थंडी सर्द हवा वाऱ्याच्या बेनाम झुळकेसारखी हळवी वाटायला लागते. दुखणाऱ्या जखमेला हळुवार फुंकर घालत रिझवते. त्या ठसठसणाऱ्या आर्त जखमेचं संगीत होऊन अवघा देह सुरमय होऊन जातो.

 
Posted in हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा

जीए

जी. ए. लव्हर्ससाठी आनंदाची बातमी.

आज त्यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या नावाची स्वतंत्र वेबसाईट प्रकाशित केली जात आहे. या वेबसाईट ची निर्माती कस्तुरी आफळे असून मराठी भाषेत तयार करण्यात आलेल्या या संकेतस्थळावर “जीएं’च्या साहित्याचा काही भाग, त्यांच्या पुस्तकांचा परिचय, त्यांची अनेक पत्रे, दुर्मिळ छायाचित्रे पाहायला मिळतील. इतर मान्यवर लेखकांना “जीएं’बद्दल काय वाटते, याच्या ध्वनिचित्रफिती आणि स्मृतिदिनानिमित्ताने होणाऱ्या प्रिय जीए महोत्सवातील लेखकांची भाषणेही संकेतस्थळावर ऐकायला मिळतील.

 
संकेतस्थळ: www.gakulkarni.com
 
 
Posted in हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा

The Road Not Taken

 

The Road Not Taken

Two roads diverged in a yellow wood,
And sorry I could not travel both
And be one traveler, long I stood
And looked down one as far as I could
To where it bent in the undergrowth;

Then took the other, as just as fair,
And having perhaps the better claim
Because it was grassy and wanted wear,
Though as for that the passing there
Had worn them really about the same,

And both that morning equally lay
In leaves no step had trodden black.
Oh, I marked the first for another day!
Yet knowing how way leads on to way
I doubted if I should ever come back.

I shall be telling this with a sigh
Somewhere ages and ages hence:
Two roads diverged in a wood, and I,
I took the one less traveled by,
And that has made all the difference.                 

– Robert Frost

कॉलेजमध्ये असताना स्पेशलायझेशनला हि कविता होती. to be very frank, त्यावेळी अशा फिलोसोफिकल का काय ते गटात मोडणाऱ्या कवितांचं प्रयोजन दाताखाली आलेल्या खड्यासारखं वाटलेलं. उमलू घातलेल्या उमेदीला पानगळीचं सिंचन जरा अजबच कॉम्बो वाटायचं. आता पुन्हा जेव्हा इथे अडखळले तेव्हा माझ्या आधीच्या प्रतिक्रियेचं मलाच हसू आलं होतं.

तेव्हा फारशी न कळलेली किंवा फारशी न रुचलेली (न झेपलेली?) ही कल्पना आज अचानक एवढी आपली का वाटू लागलीये? असं काय आहे यात की यातले सारे संदर्भ पुन्हा एकदा नव्याने भेटलेत मला आणि आधी होती तशी परकेपणाची फ्रेम निखळलिये आणि त्या जागी मला माझ्याच जगण्यातले काही कवडसे असल्याचा भास होतोय? नव्याने सापडलेल्या रस्त्यावरून दुसऱ्यांदा चालताना वाटणारी ओळखीची भावना किंवा असंच काहीसं… एवढा बदल झालाय का आपल्यात?

 

इतकं मात्र नक्की दोन्ही वेळच्या अनुभवण्यात फरक आहे नक्की…              

 
I shall be telling this with a sigh
Somewhere ages and ages hence:
Two roads diverged in a wood, and I,
I took the one less traveled by,
And that has made all the difference.
 

मळलेली पायवाट जाणीवपूर्वक नाकारताना चोखळलेली नवी वाट नव्या गोष्टी समोर घेऊन येते.. जगण्याचा कस लागूनही जे हाती लागलं ते फार खास होतं, गर्दीतून वेगळं उभं करणारं होतं. असाच एक भावार्थ या कवितेचा. म्हणालं तर गाभा या कवितेचा. माणूस म्हणलं की नाविन्याचा सोस म्हणा किंवा नवं काहीतरी ट्राय करून बघण्याची उर्मी अनादी आदिमच आहे.  कधी कधी मात्र याची दुसरी बाजूही असू शकते किंवा ती तशी असतेच हेच विसरायला होतं. जिथे एका ऐवजी दोन ऑप्शन हातात असतात

तेव्हा निर्णय काहीही असो, त्या दुसरया न जाता आलेल्या रस्त्याचा सल तर कायमच सोबतीला असतो नं? म्हणजे काहीही निवडा, मग त्या न अनुभवलेल्या वाटेचं प्राक्तन काय असलं असतं हा प्रश्न तर सही सलामत उरतोच नं? म्हणजे निर्णय घेऊनही समाधान फार कमी वेळा लाभतं. असंच काहीसं.

दुसरी बाजू कायमच unpredictable वाटत राहणार. आपल्या शेक्सपिअर साहेबांचा to  be or not to be हा प्रश्न इथे निकालातच निघतो की. आणि त्या ऐवजी what if… हा नवीन व्हर्जन पिंगा घालू लागतो नाही का? 🙂              

  – श्रद्धा
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
  
Posted in हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा