राधा

सावळ्याचं निळं गोंदण 
राधा वागवत राहिली आपल्या तन – मनावर
एक असीम ओढीनं तिनं जपले 
प्रेम आणि विरहाच्या झुल्यावरचे अबोल क्षण
सावळा कर्म आणि धर्माची वेस हाती गच्च पकडून चालत राहिला एका
आदिम-अविनाशी भविष्याकडे…
राधेनं मात्र सांभाळला रितीभातींचा जनमान्य हुंकार
प्रवाहात राहूनही प्रवाहाविरुद्ध झुंजण्याचं राधेचं स्विकारलेपण
आणि नजरेआडचं जपता जपता समोरचं नाकारणारा ‘तो’ 
द्वंद्व तर मनातच घडलं असावं अन्यथा सगळा पट हातात असतानाही सावळ्याचं
अबद्ध नाकारलेपण राधेनं पचवलं कसं असावं? 
 
कृष्ण गोंदण 
राधेचे आंदण
द्वय देहाचे  
विरले मी पण
राधा – सावळ्याची निळाई
राधा – सावळ्याच्या बासुरीचा धुंद अलवार सूर
राधा – प्राक्तनाच्या कठोर जाणिवेलाही फुंकर घालणारी मंद झुळूक
विचारले असतील का मनातल्या मनात तरी राधेनं जाब दिल्या-घेतल्या वचनांचे?
मांडले असतील का हिशेब उन्मळून पडलेल्या आवेगांचे?
की जाणाऱ्यांची वाट अडवताना त्याच्या नजरेतली असहायता तिलाच नकोशी वाटली असावी?
तरीही अनुत्तरित प्रश्नाच्या झुल्यावर हिंदोळणारी राधा आणि ते प्रश्नच टाळत राहणारा सावळ्या… दोघेही सच्चे… दोघेही शाश्वत. 
कृष्ण राधा
राधा कृष्ण
एक तन  
एक मन
     
   
श्रद्धा   
०२. ०७. २०१६       
Posted in असेच काही…, सहज सुचलेलं, हिंदोळे मनाचे | यावर आपले मत नोंदवा

आताशा,

 
पाऊस अजूनही पडतो,
माती अजूनही हुळहुळते, धुमारे फुटतात,
सृजनाची ओढ अजूनही आपलं अस्तित्व 
राखून आहे… 
 
पण….
 
‘पावसाशी हितगुज मांडणारी ती ओळख
कुठेतरी हरवून बसलीये….’
 
आताशा,
 
रस्ते तेच आहेत, चालतं होण्याची सारी प्रलोभनं जशीच्या तशीच आहेत
आपापल्या जागी,
एखादी वळणवेडी पाऊलवाट ओळखीचं स्मित करतेही कधी,
 
पण….
 
‘पावलांना गती देणारी ती हाक
हरवलीये कुठेतरी….’       
 
आताशा,
 
अजूनही थरारते मन कातरवेळी सांजवात लागताना,
नकळत हात वेढले जातात समईची ज्योत झाकोळताना,
 
पण….
 
‘आत कुठेतरी ‘ज्योतीचं’ क्षणभांगुरत्व मान्य करण्याचं पोक्तपणही
येऊ लागलंय मनाला आताशा….’           
  
– श्रद्धा
Posted in असेच काही…, कविता, सहज सुचलेलं, हिंदोळे मनाचे | १ प्रतिक्रिया

सय…

बिलगून  येता तुझ्या आठवणींचे धुमारे
अवघ्या अस्तित्वाची सतार बनते
मी गुंफत जाते तुझ्या असण्याचे भास माझ्या भोवताली,
हलकीच जाग येते मग दाटल्या निजेला . . . .

स्वप्नांचे  ओघळ, स्पर्शांचे पिसारे
अकल्पिताचे काहूर उरी दाटलेले
मी शोधीत जाते स्मरणांचे किनारे
भासातल्या आभासांचे शहारे
मी मुक्त हुंगून घेते
तृप्त कोशातला स्पर्श बावरा
हलकीच गाज मग चांदण सयीला…

गुंफलेले  काळीज दुवे अन विरघळलेले क्षण
शरीरभर उमटत गेलेली गोडसर लय
तुझ्या चाहुलीने डहुळलेली मनाची फांदी
हलकीच बरसात मग उमलत्या कळ्यांची…

मी बिलगून घेते हि वाट ओळखीची
पुन्हा पुन्हा इथे हरवून शोधताना
भेटती नव्याने क्षण सारे दुरावताना
खेळ बिलोरी हा धुंद जाणिवांचा
हलकीच सय मग मिटल्या व्यथेला…

श्रद्धा – १२.४.२०१६

Posted in कविता, हिंदोळे मनाचे | Tagged , , | यावर आपले मत नोंदवा